Pimpri News: ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्यानंतर एकाने यूट्यूब बघून वाहनचोरी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, चोरीतून मिळालेले पैसे पुन्हा ऑनलाइन गेममध्ये हरला. चाकण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्याकडून 26 लाख रुपयांच्या 18 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. चाकण पोलिसांनी ही कामगिरी केली.
अभय खर्डे (23, रा. झोळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर, सध्या रा. गुंजाळवाडी रोड, संगमनेर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. यासह चोरीच्या गाड्या विक्रीसाठी मदत करणारे रविंद्र गव्हाणे (23, रा. आंजनापूर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), शुभम काळे (24, रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), यश थुट्टे (22, रा. चिखली, जि. बुलढाणा. सध्या रा. अशोकनगर, नाशिक), प्रेम देवरे (20, रा. अशोकनगर, नाशिक) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Pimpri News in Marathi)
पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बुलेट चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. दरम्यान, एका गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी 150 सीसीटीव्ही फुटेज तपासत संगमनेर गाठले. तिथे आरोपी अभय खर्डे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चाकण आणि आसपासच्या परिसरातून 18 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच, चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी त्याला मदत करणार्या चारही आरोपींना अटक केली. त्यानुसार, ग्रामीण परिसरात विकलेल्या चोरीच्या 18 बुलेट पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
आरोपी अभय खर्डे याला ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद होता. यामध्ये तो पैसे हरला. हरलेले पैसे परत मिळविण्यासाठी त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला. यूट्यूबवर पाहून त्याने दुचाकी चोरी कशी करायची हे शिकला. बुलेटला किंमत मिळत असल्याने तो सहसा बुलेटच चोरी करीत असे. त्याच्या ताब्यातून 26 लाख रुपयांच्या 11 बुलेट, सहा स्प्लेंडर व एक यामाहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
या पथकाने केली कामगिरी
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिंकात महावरकर, अपर आयुक्त, वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार सहायक आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाथा घार्गे, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, गणपत धायगुडे, अंमलदार हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, सुनील शिंदे, शिवाजी चव्हाण, राजू जाधव, ॠषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, सुनील भागवत, महेश कोळी, महादेव विक्कड, रेवनाथ खेडकर, शरद खैरणार, नितीन गुंजाळ, किरण घोडके, माधुरी कचाटे यांच्या पथकाने केली.