वर्षा कांबळे
पिंपरी: मूल दत्तक घेण्यासाठी शासनमान्य संस्थेत दाखल होत असलेल्या बालकांची संख्या कमी आहे; तसेच दत्तक प्रक्रियेस वेळ लागत असल्याने मूल घेण्यासाठी अडीच ते तीन वर्षाचा कालावधी लागत आहे. ‘कारा’च्या संकेतस्थळावर 2751 बालकांची नोंदणी असून, इच्छुक पालकांची संख्या 33,229 एवढी आहे.
मूल होत नसल्याने अनेक जोडपी डॉक्टरांचे सल्ले घेतात. यात काही कुटुंबांना यश मिळते, तर काही जोडप्यांना यश मिळत नाही. अशावेळी काही जोडपी मूल दत्तक घेण्याचा विचार करतात. मात्र हल्ली काही अवािहित महिलांचादेखील मूल दत्तक घेण्याकडे कल दिसून येतो. त्यामुळे दत्तक मुले कमी पण इच्छुक पालकांची संख्या जास्त असल्याचे चित्र आहे. (Latest Pimpari chinchwad News)
एखादे मूल दत्तक घेण्यासाठी ‘कारा’ म्हणजेच (सेंट्रल ॲडोप्शन रिसोर्स ॲथॉरिटी) या संकेत स्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. 2015 मध्ये नियमावली करण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘कारा’ वर नोंदणी केल्याशिवाय दत्तक प्रक्रिया पार पडत नाही.
पूर्वी अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या सामाजिक संस्थांकडे इच्छुक पालक नोंदणी करायचे; मात्र त्या वेळी काही विशिष्ट संस्थांकुडे नोंदणी अधिक तर काही ठिकाणी अत्यंत कमी अशी नोंदणी असायची.
त्यामुळं काही मुलांना कुटुंब मिळवण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागायची. यावर उपाय म्हणून ‘कारा’ या संकेतस्थळावर नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे मुलांची प्रतीक्षा यादी संपली, आता कुटुंबीयांसाठी प्रतीक्षा यादी मोठी झाली आहे.
दत्तक प्रक्रियेस वेळ
दत्तक प्रक्रियेसाठी ‘कारा’च्या नोंदणी स्थळावर नोंदणी केल्यानंतर पालकांना लगेच मूल दत्तक हवे असते; मात्र शासनाने दिलेल्या प्रक्रियेनुसार काम करताना साडेतीन वर्षांचा कालावधी लागतो. या प्रक्रियेसाठी संबंधित संस्था मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची कायदेशीर प्रक्रियेनुसार आवश्यक असलेली माहिती संकलित करते. त्याचा एक अहवाल बनविला जातो. त्यानंतरही पालकांची मूल दत्तक घेण्याची इच्छा कायम आहे का, याचीही तपासणी केली जाते.
संबंधित बालकाची सर्व कायदेशीर कागदपत्रे जमा झाल्यानंतर ती बालकल्याण समितीकडे सादर केली जातात. त्यानंतर ती बालसरंक्षक कक्षाकडे जातात. त्यांचा अहवाल बालकल्याण समितीकडे येतो.
बालकल्याण समिती त्यावर निर्णय घेऊन बालकाला दत्तक देण्यासाठी मुक्त घोषित करते. यानंतर संस्था त्या मुलाच्या दत्तकाच्या पुढील प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे तयार करून बाल दत्तक संसाधन माहिती आणि मार्गदर्शन प्रणाली (सीएआरआयएनजीएस) पोर्टलवर अपलोड करते. ही दत्तक देण्यासाठी नियमावली बनविणारी संस्था तसेच परदेशात मुलांना दत्तक देण्यासाठी नोडल बॉडी म्हणून कार्यरत आहे.
काय आहे प्रक्रिया?
केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (कारा) किंवा मान्यताप्राप्त दत्तक संस्थेकडे ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर संबंधित संस्था दत्तक घेणाऱ्या पालकांच्या घराची आणि कुटुंबाची तपासणी करते.
या संबंधित पालकांच्या कुटुंबाच्या सामाजिक आणि आर्थिकस्थिती बरोबर शारीरिक आणि मानसिक स्थितीही लक्षात घेतली जाते. पालकांचे समुपदेशन केले जाते. संबंधित संस्था या सर्व बाबींचा अहवाल तयार करते. या सर्व प्रक्रियेला लागणाऱ्या कालावधीनंतर संबंधित पालकांची मुले दत्तक घेण्याची इच्छा पुन्हा मुलाखतीव्दारे तपासली जाते. त्यानंतर पालकांना मुलांची निवड करता येते.
बालकांची संख्या कमी का ?
दत्तक प्रक्रियेविषयी पालकांना माहिती नसते. पालकांचा असा समज असतो की, आपण संस्थेत गेल्यानंतर लगेच मूल दत्तक घेऊ शकतो; परंतु संस्थेमध्ये बालकांची संख्या कमी आहे. अनेक ठिकाणी बेकायदा पद्धतीने मुलांना दत्तक दिले जाते. काही एजंट मुलांना लाखो रुपयांना देखील विकतात. त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे, असे अनाथ आश्रम चालविणाऱ्या संस्थाचालकांनी नाव न छापण्याचा अटीवर सांगितले.