भोसरी : इंद्रायणीनगर-संतनगर मोशी प्राधिकरण परिसरातील नागरी व रहिवाशी भागातून खासगी ट्रॅव्हल्स बस येऊ लागल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे परिसरात अवेळी घुसणार्या अवजड वाहनांवर पोलिस प्रशासनाने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन जाणार्या कंपनी व ट्रॅव्हल कंपनीच्या बसेस जय गणेश साम्राज्य चौकातील सिग्नल वाचविण्यासाठी सांयकाळी व रात्री इंद्रायणीनगरकडे जातात. तसेच, पुढे लांडगे पेट्रोल पंपाकडून तिरुपती चौकाकडून संतनगर मोशी प्राधिकरण सेक्टर नंबर 4 मार्गे आरटीओ कार्यालय रस्त्याने पुन्हा साईनाथ हॉस्पिटलकडे जातात आणि पुढे पुणे-नाशिक महामार्गावर प्रवेश करत आहेत.
अनेकदा या रस्त्यावर अशा अवैधरित्या बसेसच्या वाहतुकीमुळे अपघात झाले आहेत. खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या भागात वाहतूककोंडी, वायू आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. तसेच, नागरिकांना फिरणे कठीण होत आहे. वाहने कोणत्याही रस्त्यावर घुसवली जात आहेत.
परिणामी नागरिकांना जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागत आहेत. वाहतुकीच्या नियमबाह्य व बेकायदेशीरपणे राष्ट्रीय महामार्ग असताना नागरी भागातील अंतर्गत रस्त्यावरून होणार्या खासगी प्रवाशी बस यांच्यावर कायदेशीर कारवाई करून कायमस्वरूपी प्रवास बंदी करून सर्वसामान्य नागरिकांना या समस्यापासून सुटका करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करू लागले आहेत.
वास्तविक पाहता वेळ व अंतर वाचविण्यासाठी सेक्टर नंबर 7 तिरुपती या मुख्य चौकात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. स्थानिक नागरिक, महिला, लहान मुले यांना या वाहतुकीचा जीवघेणा सामना दररोज करावा लागत आहे. सब डिस्ट्रीक्ट सर्कल या ठिकाणी सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक व्यायाम करीत असतात. त्यांनादेखील या भरधाव वेगाने जाणार्या बसेसचा नाहक त्रास होत आहे. इंद्रायणीनगर-संतनगर मोशी प्राधिकरण या नागरी भागातील वर्दळीच्या रस्त्यावरून अनेक बस नियमबाह्यपणे भरधाव वेगाने धावत आहेत. यामुळे निवासी भागातील नागरिक वैतागून गेले आहेत.