भरधाव कारची धडक  File photo
पिंपरी चिंचवड

Accident News : भरधाव कारची तीन दुचाकींना धडक ; सहा जण जखमी

तरुण पुलावरून पडला खाली; दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड येथील दळवीनगर पुलावर मित्रासोबत कार भरधाव घेऊन जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने तीन दुचाकींना ठोकरले. या अपघातात तीन दुचाकींवरील सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातात एका दुचाकीवरील तरुण उडून अक्षरशः पुलाखालील वखारीत जाऊन पडला. ही घटना शनिवारी (दि. 15) रात्री अकराच्या सुमारास घडली.

या अपघातात कारचालकही जखमी झाला. जखमींपैकी एका दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक आहे. सोमेश्वर श्रीधर काळे (21, रा. हनुमान मंदिरामागे, आकुर्डी, मूळ रा. टाकळी धाराव, ता. शेगाव, जि. बुलढाणा), अक्षय सुरेश बाटे (22, रा. हनुमान मंदिरामागे, आकुर्डी), राजेंद्र मनोहर वराडे (वय 55), शुभदा राजेंद्र वराडे (51, दोघेही रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड), चैतन्य पुराणिक (40) आणि पद्मजा पुराणिक (42) अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैकी राजेंद्र आणि शुभदा या दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक आहे.

सोमेश्वर काळे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वीफ्ट कारचालक समर्थ मंदार कुलकर्णी (19, रा. सृष्टी सोसायटी, रावेत) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समर्थ हा सातेगाव येथील एका महाविद्यालयात बी-टेकच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत आहे. समर्थ याचा मित्र विश्वास टेमगिरे (32, रा. रावेत, मूळ रा.शिंदे वासुली, ता. खेड) याची रावेतमध्ये डेअरी असून समर्थ त्याच्या डेअरीवर येत असे.

आरोपी समर्थ व विश्वास हे शनिवारी रात्री विश्वास याच्या मोटारीतून आकुर्डी येथे पान खाण्यासाठी आले होते. तेथून पुन्हा जात असताना समर्थ मोटार चालवीत होता. फिर्यादी सोमेश्वर व त्यांचा मित्र अक्षय हा चिंचवडवरून खंडोबा माळ चौकाकडे जात होते. याचवेळी दळवीनगर पुलावर समोरून आरोपी समर्थ हा कार भरधावपणे चालवत आला. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने सोमेश्वर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला अक्षय हा दुचाकीवरून उडून पुलाखालील वखारीत जाऊन पडला.

सोमेश्वर यांच्या पाठीमागून डिस्कव्हर दुचाकीवरून जात असलेल्या राजेंद्र आणि शुभदा या दाम्पत्यालाही कारची धडक बसली. त्यानंतर कारने चैतन्य आणि पद्मजा यांच्या दुचाकीलाही धडक दिली. या अपघातात सोमेश्वर आणि अक्षय यांच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली. तसेच, दुसर्‍या दुचाकीवरील राजेंद्र आणि शुभदा या दाम्पत्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. या दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात कारचालक समर्थ हाही जखमी झाला आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातास जबाबदार आरोपी समर्थने मद्यप्राशन केले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, त्याची खात्री करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
मकसूद मणेर, फौजदार, निगडी पोलिस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT