एचआयव्ही,www.pudhari.news 
पिंपरी चिंचवड

HIV | एचआयव्ही बाधित गरोदर महिलेला मिळाले उपचार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

मुदतपूर्व प्रसूतीनंतर एचआयव्ही पॉझिटिव्ह महिला रुग्णाच्या बाळासाठी एनआयसीयूमधील काचेची पेटी उपलब्ध नसल्याने ससुन रुग्णालयात पाठविण्यात येणार होते. मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित महिलेला उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी मध्यस्थी केल्यानंतर तिला शनिवारी (दि. १४) दुपारी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दाखल करून घेण्यात आले.

दरम्यान, शनिवारी रात्री तिची यशस्वी प्रसुती झाली आहे. मुलाचे वजन कमी असल्याने त्याला काचेच्या पेटीत ठेवले आहे. एका गरीब महिला रुग्णाला वायसीएममध्ये दाखल करुन घेत नसल्याची तक्रार जागृत नागरिक महासंघाकडे आली होती.

त्यामुळे महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव, शहर प्रमुख अशोक कोकणे, शहर उपप्रमुख मच्छिंद्र कदम, सचिव उमेश सणस, सांगवी महिला प्रमुख राजश्री शिर्के, सदस्य प्रकाश गडवे यांनी याबाबत अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

तसेच, रुग्णाला उपचार नाकारणार्या डॉक्टरांविरुद्ध तक्रार केली. त्याशिवाय, रुग्णांना सौजन्यशील वागणूक देण्याची मागणी केली. त्यानंतर डॉ. दादेवार यांनी संबंधित महिला रुग्णाला उपचारासाठी दाखल करुन घेतले.

तसेच, याबाबत संबंधित डॉक्टरांची चौकशी करण्याचे आश्वासन महासंघाला दिले. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुदतपूर्व प्रसुतीनंतर जन्माला येणार्या बाळाला एनआयसीयूमधील काचेच्या पेटीत ठेवावे लागणार होते. मात्र, त्यासाठी आवश्यक पेटी उपलब्ध नसल्याने ससुन रुग्णालयात घेऊन जाण्याबाबत सुचविण्यात आले होते.

एचआयव्ही बाधित महिला रुग्णाला पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचारासाठी नेणे शक्य नव्हते. वायसीएम रुग्णालयात या रुग्णांसाठी स्वतंत्र एआरटी केंद्र आहे. आम्ही मागणी केल्यानंतर रुग्ण महिलेला उपचारासाठी दाखल करुन घेण्यात आले. तिची सुखरूप प्रसूती झाली आहे.
- नितीन यादव, अध्यक्ष, जागृत नागरिक महासंघ
मुदतपूर्व प्रसुतीदरम्यान जन्माला आलेल्या ज्या बाळांना श्वास घेण्यात अडथळा येतो, त्यांना एनआयसीयूमध्ये काचेच्या पेटीमध्ये ठेवावे लागते. जेव्हा ही काचेची पेटी उपलब्ध नसते अशा वेळी रुग्णांना ससून रुग्णालयात उपचारासाठी जाण्याबाबत सुचविले जाते.
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय,

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT