सांभाळण्यासाठी दिलेल्या मादी श्वानाला डांबून ठेवून ठार मारले. हा धक्कादायक प्रकार ५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत नेरे - दत्तवाडी येथील ऍनिमल वेल्फेअर ट्रस्टच्या शेल्टरमध्ये घडला.
याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. २२) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ॲनिमल वेल्फेअर ट्रस्टचे संस्थापक रोहित चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बाणेर येथे राहत असून त्या प्राणीप्रेमी आहेत. त्या राहत असलेल्या सोसायटीच्या आवारात एक मादी जातीचे भटके श्वान जखमी अवस्थेत फिरत असल्याचे त्यांनी पाहिले. सुरुवातीला त्यांनी श्वानाला जेवणातून औषध दिले. मात्र, श्वानाच्या मागच्या पायाला झालेली जखम बरी होत नव्हती. त्यामुळे त्यांनी ४ ऑक्टोबर रोजी अॅनिमल वेलफेअर ट्रस्टचे संस्थापक असणारे आरोपी रोहित चौधरी यांच्याशी संपर्क साधला.
श्वानाचा संभाळ करण्यासाठी फिर्यादी यांनी आरोपीला दोन टप्प्यांत बारा हजार रुपये दिले. शेल्टरमध्ये लावण्यासाठी दोन सिलिंग फॅनही दिले. सिंलिंग फॅन लाऊन फोटो पाठवा. तसेच, आमच्या मादी श्वानाचेही फोटो पाठवा, अशा फिर्यादी यांनी आरोपी चौधरी यांना विनंती केली. मात्र, आरोपीने फोटो पाठविले नाही. श्वानाला २५ टक्के रेबिज झाला आहे. रक्त तपासणीचा अहवाल प्राप्त होताच पाठवतो, असे आरोपीने सांगितले. मात्र, अहवालही पाठविला नाही.
आरोपी चौधर यांचे बोलणे संशयास्पद वाटल्याने ९ ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांनी आपल्या सोसायटीतील सहकाऱ्याला शेल्टरमध्ये पाठविले. त्या वेळी शेल्टर बंद होते. तसेच, शेल्टरमध्ये फिर्यादीचे श्वान दिसून आले नाही. इतर श्वानही खूप वाईट परस्थितीमध्ये ठेवलेली दिसून आली. फिर्यादी यांना ही बाब कळताच त्यांनी तात्काळ सोसायटी फॉर अॅनिमल सेफ्टी संस्थेकडे तक्रार केली. त्यानंतर फिर्यादी श्वान आणण्यासाठी शेल्टर येथे गेले असता तुमचे श्वान पळून गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. श्वान सापडत नसल्याने फिर्यादी यांनी श्वानाचे पॅम्प्लेट छापून परिसरात वाटले. तेव्हा एका व्यक्तीने शेल्टर जवळच एक मृत श्वान असल्याचे सांगितले. घटनास्थळी पोहचले असता फिर्यादी यांनी संभाळण्यासाठी दिलेले श्वान जळालेल्या तसेच मृत अवस्थेत आढळून आले. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.
पुण्यात दोन दिवसांपूर्वी दत्तवाडी येथे श्वान अंगावर धावून आला म्हणून एकाने स्वत:च्या बचावासाठी श्वानावर पिस्तूलातून गोळी झाडली. सुदैवाने यात कुत्रा बचावला. तसेच, मंगळवारी (दि. २२ ) पौड येथे श्वानाच्या मालकाने श्वानाला फासावर लटकविल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या दोन घटना ताज्या असतानाच हिंजवडीच्या हद्दीत श्वान ठार मारल्याची घटना उघडीस आल्याने प्राणी मित्रांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
श्वानाच्या मृत्यू प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वानाचा मृत्यू नक्की कोणत्या कारणाने झाला, याचा तपास सुरू आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आले नाही.कन्हैय्या थोरात, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, हिंडवडी पोलिस ठाणे