धडाडधूमचा आवाज... अन् आकाशातून कोसळला भला माेठा बर्फाचा गोळा File Photo
पिंपरी चिंचवड

Rain Update | ओतूरच्या डोमेवाडीत कोसळला २५ किलो बर्फाचा गोळा; शेतमजूरवर्गात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

ओतूर : पुढारी वृत्तसेवा

मोठ्या संख्येने शेतमजूर शेतात काम करीत असताना आकाशात अचानक धडाडधूम असा कानठळ्या बसविणारा आवाज होऊन अचानक एक भलामोठा गोळा शेजारच्या शेतात कोसळला.

बाजूच्या शेतमजुरांना शेजारच्या शेतात काहीतरी पडल्याचे स्पष्ट जाणवले. तेथे जाऊन बघितले असता तो आकाशातून पडलेला एक बर्फाचा मोठा गोळा होता. या बर्फाच्या गोळ्याचे वजन सुमारे २५ ते ३० किलो इतके होते. निसर्गाची ही किमया या भागात पहिल्यांदाच बघायला मिळाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ही घटना ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील डोमेवाडी येथील बाबाजी वाजगे यांच्या गट क्र. ३२५ या शेतात सोमवारी (दि. २३) दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने शेतमजूरवर्ग भयभीत झाला आहे. हा बर्फाचा मोठा गोळा अचानक जमिनीवर कसा कोसळला? तसेच अजूनही असे घडू शकते का? याबाबत परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. स्थानिक शेतकरी संतोष डुंबरे, पंकज डुंबरे, बबन भोरे, तुकाराम डुंबरे, बाबूराव डुंबरे, रामदास भोरे, बाळू भोरे, संतोष नलावडे, बाळासाहेब भोरे,

प्रवीण डुंबरे, अमित भोरे आदी शेतमजूर या वेळी बाजूच्या शेतात कामाला होते. त्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली. हा गोळा एखाद्याच्या डोक्यात पडला असता तर जीवितहानी होण्याची शक्यता या शेतमजुरांनी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT