पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
तरुणांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून एका १२ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना भोसरी येथे ६ जून रोजी घडली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
क्षितीज लक्ष्मण पराड (२०, रा. भोसरी) आणि तेजस पांडुरंग पठारे (१९, रा. चहोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मयत मुलीच्या वडिलांनी शनिवारी (दि. ५) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १२ वर्षीय मुलीने ६ जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरामध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
फिर्यादी यांनी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावरून आरोपी पराड आणि पठारे यांनी तिचा वारंवार पाठलाग केल्याचे समोर आले.
अधिक माहिती घेतली असता आरोपींनी मुलीचा लैंगिक छळ केल्याचे फिर्यादी यांना समजले. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. भोसरी पोलिस तपास करत आहेत.