भरोसा सेल Pudhari
पिंपरी चिंचवड

सुशिक्षितांच्या नात्यात हरवतोय ‘भरोसा’

शहरातील 85 टक्के कौटुंबिक वाद उच्चशिक्षित दांपत्यांचे

संतोष शिंदे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या भरोसा सेलकडे गेल्या वर्षभरात आलेल्या 566 कौटुंबिक वादांपैकी तब्बल 85 टक्के प्रकरणे सुशिक्षित दांपत्यांची आहेत. ही आकडेवारी धक्कादायक आहे. एकीकडे शिक्षणाने समाज सुधारतो, नातेसंबंध समजूतदार होतात, अशी अपेक्षा असते. मात्र, पोलिसांच्या भरोसा सेलकडे येत असलेल्या तक्रारीवरून वेगळेच चित्र स्पष्ट होत आहे.

उदाहरण

मागील वर्षी एक उच्चशिक्षित जोडपे पोलिसांच्या ‘भरोसा सेल’मध्ये आले. दोघेही मल्टिनॅशनल कंपनींमध्ये उच्च पदावर काम करत होते. विवाहानंतर सुरुवातीला सगळं छान होतं. मात्र, नंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात मोठे वाद होऊ लागले. मी हे असं का केलं, तू का नाही केलं?, माझ्या आई-वडिलांबद्दल तुला आदर नाही, अशा मुद्यांवरून दोघांमध्ये तणाव वाढला. शेवटी दोघेही एकमेकांपासून दुरावले. पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये आल्यावर त्यांना समजलं की त्यांच्या नात्यात संवादाचाच अभाव होता.

भरोसा सेलचे काम कसे चालते?

कौटुंबिक वाद, पती-पत्नीमधील संघर्ष, घरगुती हिंसाचार यासाठी थेट पोलिस ठाण्याऐवजी भरोसा सेल हा पर्याय आहे. येथे पती-पत्नीची स्वतंत्र बाजू ऐकली जाते. दोघांचे स्वतंत्र समुपदेशन केले जाते. त्यानंतर एकत्रित समुपदेशनातून गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न होतो. कायदेशीर सल्लाही दिला जातो. गरजेनुसार प्रकरण पुढे पोलिस ठाण्यात किंवा न्यायालयात पाठवले जाते.

प्री-वेडिंग समुपदेशन महत्त्वाचे

आज प्री-वेडिंग फोटोशूट्स, डेस्टिनेशन शूट्स यांची चलती आहे. पण प्री-वेडिंग समुपदेशनफ हवे की नाही, यावर अजूनही समाज गप्प आहे. लग्न ठरताच दोघांनाही एकत्र बसवून त्यांच्या स्वभाव, कौटुंबिक पार्श्वभूमी, अपेक्षा यावर संवाद घडणे गरजेचे आहे. यामुळे नात्याचा पाया मजबूत होईल, असे समुपदेशकांचे मत आहे.

अशिक्षितांमध्येअधिक समजूत ?

अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या जोडप्यांमध्ये वादाचे प्रमाण फक्त 15 टक्के असून, त्यातही समेटाचे प्रमाण अधिक आहे. ते भांडतात, पण तडजोडीला तयार असतात. त्यांच्या नात्यांमध्ये जिव्हाळा अधिक, तत्त्वज्ञान कमी, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने पुढारीशी बोलताना सांगितले.

पती-पत्नीमधील वादाची प्रमुख कारणे (विशेषतः सुशिक्षितांमध्ये)

1) स्वातंत्र्य आणि अधिकारांची टक्कर

- दोघंही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, दोघांनाही मबरोबरीफ हवी

2) करिअर प्राधान्य

- एकमेकांसाठी वेळ न मिळणे

3) सासर-माहेरचा हस्तक्षेप

- पारंपरिक संस्कृतीच्या विरुद्ध

आधुनिक विचारांची टक्कर

4) इगो क्लॅश

- कमी पणा कोण घेणार ?

5) भावनिक अंतर

- संवादाचा अभाव, सोशल

मीडियातील दिखावूपणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT