लोणावळा: शहरातील जुन्या खंडाळारोड येथील एका बंद घरात झालेल्या घरफोडीप्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 30 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोन आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
47 तोळे सोने केले लंपास
लोणावळा शहर पोलिस ठाण्यामध्ये बिना मुळे (वय 65) यांनी 9 जून 2025 रोजी घरफोडीची तक्रार दाखल केली होती. फिर्यादी हे मुलगी अबोली हिच्या घरी गेल्यामुळे घर बंद होते. दरम्यान, चोरट्यांनी कुलूप तोडून घरातून 47 तोळे सोने आणि 2 किलो चांदी असा सुमारे 29 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. (Latest Pimpri News)
याप्रकरणी पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते. गुन्ह्याचा समांतर तपास करताना लोणावळा पोलिस ठाणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात तिघे चोरटे रेल्वेने पिंपरी-चिंचवडकडे जाताना आढळून आले.
चोरीचा माल विकला
16 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वडगाव मावळ येथे सापळा रचून चंद्रकांत ऊर्फ चंदू माने (वय 32, रा. चिंचवडगाव) आणि धनंजय काळे (वय 20, रा. चिंचवडगाव) यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेला ऐवज दीपक मंदगे (रा. कर्जत) आणि कैलास जाट (रा. वाशी) यांच्या मदतीने विकल्याचे उघडकीस आले. त्यांच्या ताब्यातून 34 तोळे सोने, 2 किलो चांदी असा एकूण 30 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
प्रमुख आरोपी चंद्रकांत माने याच्यावर कर्नाटक, चेन्नई, सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड येथे 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वीच चेन्नई येथील गुन्ह्यातून जामिनावर सुटून आला होता. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पोलिस निरीक्षक राजेश रामाधरे, अभिजित सावंत, राहुल लाड, रमेश भिसे, सूर्यकांत वाणी, पोलिस अंमलदार राहुल पवार, सागर नामदास, धिरज जाधव, तुषार भोईटे, अमोल शेडगे, वैभव सावंत, समाधान नाईकनवरे, समीर तांगडे, मुकुंद कदम, संदीप मानकर, अविनाश जाधव, तुषार भोसले यांनी केली आहे.