पिंपरी: मावळ तालुक्यातील पवना धरणात सातत्याने पाणीसाठा वाढत आहे. सद्यस्थितीत 78 टक्के पाणीसाठा असल्याने धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून मंगळवारी (दि.15) विसर्ग वाढवून सायंकाळी सातपासून तो 2940 क्युसेक इतका करण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदीचे पात्र फुगले असून, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढत आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्राकरिता हवामान विभागाचा रेड अलर्ट दिल आहे. (Latest Pimpri News)
धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दुपारी चारपासून सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये होणारा विसर्ग वाढवून 2050 क्युसेक इतका करण्यात आला आहे. पाऊस वाढल्याने सायंकाळी सातपासून 2940 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
त्यामुळे पवना नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात फुगले आहे. नदीकाठचे नाले भरून वाहत आहेत. या विसर्गात आणखी वाढ होऊ शकतो. त्यामुळे केणीही नदीपात्रात उतरू नये. नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठचे शेतीअवजारे व इतर साहित्य तसेच, जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने केले.