पिंपरी: घरगुती वीजकनेक्शन मंजूर करून देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी (दि. 5) स्पाईन सिटी, भोसरी येथील महावितरण कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे (वय 34) आणि खासगी इसम श्यामलाल असोकन (34, रा. बोराटेवाडी, मोशी) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका सरकारी विद्युत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. (Latest Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महावितरणच्या मंजुरीसाठी लायझनिंग व कनेक्शनची प्रक्रिया हाताळणारे शासकीय ठेकेदार आहेत. दरम्यान, 4 जून रोजी त्यांनी एका ग्राहकाच्या घरगुती वीज कनेक्शनसाठी भोसरी येथील महावितरण कार्यालयात अर्ज केला होता.
संबंधित अर्जाची फाईल सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी आली होती. त्यांनी कनेक्शन मंजूर करुन देण्यासाठी 35 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम 25 हजार रुपये ठरली. त्यानंतर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीच्या आधारे पथकाने गुरुवारी (दि. 5) सापळा रचून महावितरण कार्यालयात ही कारवाई केली. नरवडे व त्यांचा साथीदार असोकन हे दोघेही 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.