Pimpri Chinchwad Phugewadi Toxic Liquor Death: पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात तब्बल 13 जणांच्या संशयास्पद मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच भागातील नागरिकांचा अल्पावधीत मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या मृत्यूमागे विषारी गावठी दारू कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत कथित दारू विक्रेता कर्नेलसिंग विरका आणि त्याच्या काही नातेवाईकांना अटक केली आहे.
फुगेवाडीतील आझाद चौक परिसरात ही घटना उघडकीस आली. परिसरातील एका फलकावर मृतांची नावे लिहिण्यात आल्यानंतर अनेकांना या घटनेची माहिती मिळाली आणि स्थानिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे, एकाच दिवशी 13 जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, आझाद चौक परिसरात हातभट्टी आणि गावठी दारूचे अवैध अड्डे सुरू होते. याच ठिकाणी विकल्या जाणाऱ्या कथित विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या मृत्यूंमुळे अवैध दारू व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कर्नेलसिंग विरका नावाची व्यक्ती फुगेवाडीत कथित दारू विक्रीचा व्यवसाय करत होती. तसेच, योगेश वानखेडे याच्याकडून पुरवठा करण्यात येणारी दारू कर्नेलसिंगकडे विक्रीसाठी पोहोचत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर पोलिसांनी कर्नेलसिंग आणि त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेत अटक केली.
दरम्यान, ज्या ठिकाणी दारूची विक्री होत असल्याचा आरोप आहे, त्या परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संतप्त नागरिकांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अवैध दारूविक्रीवर प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती, तर इतक्या निष्पाप लोकांचा जीव गेला नसता, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार श्रीरंग बारणे यांनी अशा प्रकारच्या विषारी दारू विक्रीला आळा बसला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय अहवाल, शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासानंतरच मृत्यूमागील सत्य समोर येणार आहे. तोपर्यंत पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग या संपूर्ण साखळीचा तपास करत असून, आणखी काही जणांच्या सहभागाचाही शोध घेतला जात आहे.