Latest

व्यक्‍तिचित्र : सलाम, पीटर हिग्ज…

Arun Patil

आपलं विश्व समजून घेण्याच्या कामात पीटर हिग्ज यांच्यामुळं फार मोठी भर पडली. अत्यंत तरल बुद्धिमत्ता असलेले हिग्ज हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे गृहस्थ होते. त्यांनी जे मूलभूत स्वरूपाचं काम केलं, ते होतं मूलकणांच्या शोधांचं! नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यानिमित्ताने…

अत्यंत तरल बुद्धिमत्ता असलेले पीटर हिग्ज हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे गृहस्थ होते. त्यांनी 1960 च्या दशकात जे मूलभूत स्वरूपाचं काम केलं, ते होतं मूलकणांच्या शोधांचं! या कणांमुळंच विश्वातल्या सर्व मूलभूत कणांना वस्तुमान मिळतं, असं प्रतिपादन पीटर हिग्ज यांनी केलं होतं. मात्र, ते कण शोधायचे कसे, या प्रश्नावर सारं गाडं अडलेलं होतं.

2012 सालामध्ये या कणांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला. स्वित्झर्लंडमध्ये 'युरोपियन कौन्सिल फॉर न्यूक्लिअर रिसर्च' (सर्न) या संस्थेतील 'लार्ज हेड्रॉन कोलायडर'मध्ये हिग्ज सांगत असलेल्या कणांचा 'शोध' लागला. तिथं हे कण 'घडताना' दिसले! त्यामुळं असे कण खरोखरच अस्तित्वात आहेत, असा पुरावाच मुळी माणसाच्या हातात आला. आपलं विश्व आणि त्याची रचना समजून घेण्याच्या द़ृष्टीनं हे एक फारच मोठ्या स्वरूपाचं यश होतं.

पीटर हिग्ज यांनी केलेल्या या मूलभूत कामाची दखल घेतली गेली आणि पुढच्याच वर्षी, म्हणजे सन 2013 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक जाहीर झालं. यंदाचं भौतिकशास्त्रातील कामगिरीबद्दलचं नोबेल पारितोषिक आपल्याला मिळणार, अशी पीटर हिग्ज यांना खात्री वाटत होती. त्यामुळंच ज्या दिवशी हे पारितोषिक जाहीर व्हायचं होतं, त्या दिवशी ते आपल्या घरामध्ये न थांबता बाहेर पडले. याचं कारण त्या पारितोषिकाबरोबर मिळणारी प्रचंड प्रसिद्धी त्यांना जाचक वाटत होती. भौतिकशास्त्रातील कामासाठी आपल्याला नोबेल पुरस्कार जाहीर झाला की, सार्‍या जगाचंच लक्ष आपल्याकडं वेधलं जाईल आणि ते तर फारच तापदायक ठरेल, या जाणिवेनं हिग्ज अस्वस्थ झाले आणि ते अस्वस्थ होणं अगदी स्वाभाविकच होतं.

त्यांना फार जवळून ओळखणारे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील भौतिकशास्त्राचे प्रा. अ‍ॅलन ब्रार सांगतात की, विश्वाच्या आमच्या आकलनामध्ये हिग्ज यांच्या कामामुळं फार मोठी भर पडली आहे. असं मूलगामी करणारे हिग्ज हे अत्यंत सौम्य स्वभावाचे आहेत. ते खरेखुरे सज्जन गृहस्थ आहेत. दुसर्‍याशी वागताना-बोलताना ते अतिशय सौजन्यशील असतात. नम्रपणं बोलतात. ज्याच्या त्याच्या कामाचं श्रेय ते संबंधिताला देतात. 'सर्न'चे प्रमुख फबिओला ग्यानोटी यांनीही हिग्ज यांच्याबद्दल अशाच स्वरूपाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, जगभरात भौतिकशास्त्रामध्ये जे काम करत आहेत, त्या सर्वांना हिग्ज यांच्या कार्यामुळं नेहमीच प्रेरणा मिळते. उत्तम शिक्षक असलेले हिग्ज वागा-बोलायला अतिशय साधे आहेत. सर्वांशीच ते फार अदबीनं बोलतात. मुख्य म्हणजे, भौतिकशास्त्रातल्या संकल्पना ते अतिशय सोप्या भाषेत मांडतात.

हिग्ज यांचा हा स्वभाव लक्षात घेतला, तर नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यापाठोपाठ मिळणारी प्रसिद्धी त्यांना किती तापदायक वाटली असेल, याची आपण कल्पना करू शकतो. हा ताप चुकवण्यासाठी 82 वर्षांचे पीटर हिग्ज रस्त्यावरून भटकत राहिले. जेवणाची वेळ झाल्यावर एका खानावळीत जाऊन ते जेवले. जेवण झाल्यावर ते चित्रांचं एक प्रदर्शन बघायला गेले. तिथंही त्यांनी बराच वेळ घालवला. नंतर तिथून ते बाहेर पडले आणि मग त्यांना त्यांच्या शेजारी राहणारे गृहस्थ भेटले. हिग्ज यांना पाहून त्या शेजार्‍यानं मोठ्या आनंदानं 'तुम्हाला नोबेल पारितोषिक जाहीर झालं आहे,' अशी बातमी त्यांना दिली. ती ऐकल्यानंतर मात्र हिग्ज यांचे डोळे पाणावले. आपला अंदाज खरा ठरला, आपल्या कामाला पाच दशकांनंतर का होईना; पण विज्ञानवंतांकडून मान्यता मिळाली, या भावनेनं त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.

पीटर हिग्ज यांच्याप्रमाणंच आणखीन सहा शास्त्रज्ञांनीसुद्धा या कणांवर काम केलं होतं; पण आपलं प्रतिपादन त्यांना सिद्ध करता आलं नाही. हिग्ज त्याबाबतीत कमी पडले नाहीत, याचं कारण 'सर्न' येथील 'लार्ज हेड्रॉन कोलायडर'मध्ये या कणांची निर्मिती होतानाच दिसली! या कणांना 'हिग्जबोसॉन' असं नाव पडलं आहे. याचं कारण अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्याबरोबर काम करणारे भारताचे एक थोर संशोधक सत्येंद्रनाथ बोस यांनी 1920 मध्ये यासंदर्भात मोलाचं काम केलं होतं. त्यामुळंच हिग्ज आणि बोस यांच्या सन्मानार्थ या कणांना 'हिग्जबोसॉन' असं नाव देण्यात आलं.

हिग्ज यांनी जे काम केलं, त्यामुळं आपलं अथांग असलेलं विश्व समजून घेण्यामध्ये फार महत्त्वाची मदत झाली. खरं तर विश्वामध्ये काही वस्तुमान हे लपलेल्या अवस्थेत आहे, असा संशय या क्षेत्रात काम करणार्‍या संशोधकांना अगदी 19 व्या शतकापासूनच येत होता. उदाहरणार्थ, उष्मागतिकीचे (थर्मोडायनामिक्स) नियम मांडणार्‍या लॉर्ड केल्विन या गणिती आणि भौतिकशास्त्रज्ञानं 1884 च्या सुमारास विश्वातील लपलेल्या पदार्थाची कल्पना मांडली होती. त्यानंतर 22 वर्षांनी, म्हणजे 1906 सालामध्ये, फ्रान्समधल्या हेन्री पाँकेअर या गणिततज्ज्ञानं आकाशगंगेत असे लपलेले पदार्थ आहेत, ही लॉर्ड केल्विन यांनी मांडलेली कल्पना उचलून धरली. इतकंच नाही, तर अशा आपल्यापासून लपून राहणार्‍या पदार्थाला त्यांनी 'कृष्ण पदार्थ' (डार्क मॅटर) असं नाव दिलं.

पुढे 1930 च्या दशकामध्ये प्रीत्झ झ्वीकी या भौतिकशास्त्रज्ञांनी 'कोमा तारकाविश्वांच्या समूहा'चं सखोल निरीक्षण केलं. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की, या वेगानं फिरणार्‍या तारकाविश्वांना या समूहात धरून ठेवण्यासाठी लागणारं गुरुत्वाकर्षणबळ तिथं लपलेल्या वस्तुमानाच्या अवस्थेत असावं. म्हणजेच त्यांच्या निरीक्षणातूनसुद्धा कृष्ण पदार्थांच्या अस्तित्वाच्या खुणाच दिसत होत्या! अशा आपल्यापासून लपून राहिलेल्या कणांचा, म्हणजेच 'हिग्जबोसॉन' कणांचा वेध पीटर हिग्ज यांनी घेतला आणि 2012 मध्ये 'सर्न'मधील 'लार्ज हेड्रॉन कोलायडर'मध्ये या कणांच्या अस्तित्वाचा पुरावाच हाती लागला. त्याला 'गॉड पार्टिकल' म्हणजे दैवीकण असं म्हटलं जात असलं, तरी ते नाव पीटर हिग्ज यांना आणि अन्य संशोधकांनाही अजिबातच मान्य नव्हतं आणि नाही; पण ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे
आहे की, आपलं विश्व समजून घेण्याच्या कामात पीटर हिग्ज यांच्या कामामुळं फार मोठी भर पडली. त्याबद्दल आपण त्यांना सलामच केला पाहिजे.

रामन यांनासुद्धा खात्री होती..!

भारताच्या सी. व्ही. रामन यांनासुद्धा आपल्याला नोबेल पारितोषिक मिळणार, याची पक्की खात्री होती. तीसुद्धा खरी ठरली. रामन यांनी दि. 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी कोलकाता येथील 'इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' या संस्थेत 'रामन परिणामा'ची घोषणा केली. त्यानंतर ऑक्टोबर 1928 मध्येच अ‍ॅर्नोल्ड सॉमरफेल्ड हे भौतिकशास्त्रज्ञ भारतात आले होते. त्यांनी रामन यांची भेट घेतली. रामन यांनी त्यांना आपलं संशोधन प्रयोग करून स्पष्ट करून सांगितलं. त्यानंतर सॉमरफेल्ड यांनी रामन यांचं नाव नोबेल पारितोषिकासाठी सुचवलं. ही गोष्ट रामन यांना समजली, तेव्हा त्यांनी सॉमरफेल्ड यांचे आभार मानले आणि पुढच्या वर्षी माझं नाव सुचवलं गेलं, तर नोबेल पारितोषिकाची समिती माझ्या बाजूनं निर्णय देईल, असं सॉमरफेल्ड यांना कळवून टाकलं. परंतु, रामन यांचं नाव नील्स बोरसारख्या शास्त्रज्ञांनी 1929 सालीच सुचवलं होतं. ते त्यावेळी मान्य झालं नाही. 1930 मध्ये मात्र पुन्हा रामन यांचं नाव नील्स बोर, रूदरफोर्ड यासारख्या 10 शास्त्रज्ञांनी सुचविलं आणि ते मान्य झालं. रामन यांना त्यावर्षीचं नोबेल पारितोषिक मिळालं.

अनुकरणीय पैलू

एडिंबरा युनिव्हर्सिटीतून निवृत्त झाल्यावरही हिग्ज हे भौतिक क्षेत्रात संशोधन करत राहिले. विविध परिषदांनाही ते नियमितपणं हजेरी लावत असत. एका अर्थानं ते अखंड विद्याव्यासंगी म्हणूनच जगले. त्यांच्या या ज्ञानव्रती आयुष्यानं त्यांना अनेक मानसन्मानही मिळवून दिले. नोबेल पारितोषिक हा त्यातला एक फार मानाचा समजला जाणारा सन्मान. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वानं चमकणारे हिग्ज यांनी आपला जिथं रहिवास होता, त्या एडिंबरा शहरासाठीसुद्धा बरंच काम केलं. त्यामुळंच 2011 साली त्यांना 'एडिंबरा पारितोषिक' देण्यात आलं. आपल्या रहिवासाच्या ठिकाणाच्या प्रगतीसाठी काम करणारे जे मोजके ज्ञानवंत असतात, त्यातले एक म्हणजे पीटर हिग्ज! त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला हा पैलूसुद्धा अनुकरण करण्यासारखाच आहे.

प्रयोगशाळेतील कामात रस नव्हताच…

हिग्ज यांना अगदी लहान वयातच आपला जीव प्रयोगशळेत रमत नाही, याची जाणीव झाली होती. त्यामुळं त्यांनी प्रयोगनिष्ठ संशोधनाऐवजी सैद्धांतिक पातळीवरील संशोधन हेच आपलं कार्यक्षेत्र मानलं. 1960 च्या दशकामध्ये ते इंग्लंडमधल्या एडिंबरा युनिव्हर्सिटीत व्याख्याता म्हणून काम करू लागले, तेव्हापासूनच त्यांनी भौतिकशास्त्राशी संबंधित आपला वाचनाभ्यास सतत सुरूच ठेवला होता. त्याच काळात त्यांनी योईशिरो निम्बू आणि जेफरी गोल्डस्टोन यांचा एक शोधनिबंध वाचला. परंतु, त्यामध्ये मूलभूत कणांच्या परस्पर क्रिया-प्रक्रियांमध्ये त्यांनी विद्युतचुंबकीय क्षेत्राचा विचारच केला नाही, असं हिग्ज यांच्या लक्षात आलं. तरीसुद्धा निम्बू आणि गोल्डस्टोन यांना नवीन कण मिळाले. त्यांचं नाव 'गोल्डस्टोन बोसॉन्स!' हिग्ज मात्र या शोधनिबंधाचा विचार करत राहिले. 'त्यातूनच आपल्याला योग्य तो मार्ग दिसला,' असं हिग्ज म्हणत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT