Latest

पाकिस्‍तानात इम्रान खान यांच्‍याविरोधात ‘भडका’, जामिनाविरोधात ‘पीडीएम’चा सुप्रीम कोर्टाला घेराव

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानमधील राजकीय संघर्ष आणखी चिघळला आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्‍यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जामीन मिळाल्‍यानंतर आता सत्ताधारी पक्षांनी आंदोलन सूरु केले आहे. 'पीडीएम' समर्थकांनी आज ( दि.१५) सुप्रीम कोर्टालाही घेराव घातला. या आंदाेलनात पाकिस्तान लोकशाही चळवळ, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम-फझल यासह अनेक राजकीय पक्षांचा समावेश आहे.
( Pakistan's political crisis )

Pakistan's political crisis : इम्रान खान यांच्‍या पत्‍नीलाही जामीन

इम्रान खानची पत्नी बुशरा बीबी यांना जामीन मिळाला आहे. लाहोर उच्च न्यायालयाने त्यांना २३ मे पर्यंत जामीन मंजूर केला आहे. बुशरा बीबीसह इम्रान  खानही उच्च न्यायालयात पोहोचले. दरम्‍यान, इम्रान खान यांच्‍या समर्थनात पीटीआयचे कायकर्ते आंदोलन करत आहेत. पीटीआयने या काळात अटक केलेल्या पक्षातील नेत्यांची यादीही प्रसिद्ध केली आहे. दरम्‍यान, पीटीआयच्‍या सुमारे सात हजार कार्यकर्ते आणि नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले असून, त्यात महिलांचाही समावेश आहे, असा दावा 'पीटीआय'ने केला आहे. सर्वोच्च न्यायालयावर कब्जा करण्यासाठी आणि देशातील घटना नष्ट करण्यासाठी सत्ताधारी पक्ष गुंडांना मदत करत आहेत, असा आरोपही पक्षाच्‍या वतीने करण्‍यात आला आहे.

पाकिस्‍तान सरन्‍यायाधीशांविरोधात 'एनए'मध्‍ये ठराव मंजूर

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्‍लीमध्ये सरन्‍यायाधीश (सीजेपी) उमर बंदियाल यांच्‍याविरोधात आज (दि.१५) ठराव मंजूर करण्‍यात आला, असे वृत्त 'एआरवाय' न्‍यूजने दिले आहे. आज सभागृहाचे नियमित कामकाज स्‍थगित करुन नॅशनल असेंब्‍लीमध्‍ये सरन्‍यायाधीश बंदियाल यांच्‍याविरोधात ठराव मांडण्‍यात आला. यावेळी सभागृहाला संबोधित करताना संरक्षण मंत्री ख्‍वाजा आसिफ म्‍हणाले की, न्‍यायव्‍यवस्‍थेचा एक भाग भ्रष्‍टाचार प्रकरणामध्‍ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्‍यक्ष इम्रान खान यांना अभूतपूर्व सवलती देत आहे. आता संसदेने आपले अधिाकरल ठरवले पाहिजेत असेही त्‍यांनी नमूद केले.

विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांनी देशात नुकत्याच झालेल्या हिंसक कारवायांचा तीव्र निषेध केला. लाहोरमधील कॉर्प्स कमांडर हाऊस आणि शहीदांच्या स्मारकांवर हल्ला करणारे राज्याचे शत्रू आहेत. या घृणास्पद कृत्यांमागे 'पीटीआय'चे प्रशिक्षित घटक आहेत, असा आरोपही त्‍यांनी केला. न्यायव्यवस्था पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना 'सवलती' देत आहे ज्यांच्या इशाऱ्यावर सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांची तोडफोड करण्यात आली, असेही त्‍यांनी सभागृहास सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT