पिंपरी: महापालिकेची 8 रुग्णालये आणि 28 दवाखान्यांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. डिजिटल हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन सिस्टिम अंतर्गत ही कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली. निविदा कार्यवाही पूर्ण होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने डिजिटायझेशनची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
डिजिटायझेशन नसल्याने होणारे तोटे
- महापालिका रुग्णालयांमध्ये सध्या सर्व काम कागदोपत्री करावे लागते.
- त्यामुळे रुग्णांचे केसपेपर व अन्य कागदपत्रे सांभाळावी लागतात.
- सर्व कामे लिखित स्वरुपात होत असल्याने जास्त मनुष्यबळाची गरज लागते.
- कामामध्ये अचूकता येत नाही.
- रुग्णालयांनी औषधांची मागणी केल्यानंतर त्यांची औषधाची गरज समजते. त्यामुळे औषधे वेळेत पोहचण्यास विलंब होतो.
डिजिटायझेशन केल्यानंतर होणारे फायदे
- रुग्णालयांतील कामांना गती येण्यास मदत होईल.
- महापालिकेच्या एका रुग्णालयातून दुसर्या रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांवर यापूर्वी केलेल्या वैद्यकीय उपचाराची माहिती त्वरित समजू शकेल.
- मध्यवर्ती औषध भांडाराला रुग्णालयांची औषधांची मागणी लवकर कळल्याने वेळेत ही औषधे उपलब्ध होऊ शकतील.
- रुग्णालयात कोणती औषधे उपलब्ध आहेत, याची माहिती डॉक्टरांना संगणकावरच समजू शकणार असल्याने त्यांना त्यानुसार औषधे देणे शक्य होईल.
- रुग्णालयांना औषधे तातडीने मिळून रुग्णांची होणारी परवड थांबेल.
महापालिका रुग्णालये व दवाखान्यांच्या डिजिटायझेशनसाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. महिनाभराच्या कालावधीत त्यावर आवश्यक कार्यवाही पूर्ण होईल. त्यानंतर वर्षभरात टप्प्याटप्प्याने डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.