Latest

पार्थ पवारांची शिरूरमध्ये बॅनरबाजी; पुन्हा एकदा उमेदवारीबाबत चर्चा सुरू

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाढ्य नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावल्याने पुन्हा एकदा पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पार्थ पवार यांची शिरूर लोकसभा मतदारसंघात चाचपणी सुरू आहे.

राज्यातील सत्तांतरनाट्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, अनेक मतदारसंघांतील राजकीय गणितेदेखील बदलली आहेत. राज्यात विविध कारणांमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. यामध्ये मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे पक्षावर नाराज असून, लवकरच ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. शिवसेनेचे कट्टर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात सहभागी झाल्याने कोल्हे व आढळराव पाटील या दोघांची गोची झाली असतानाच शिरूर लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर तुलनेत सोपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे बर्‍यापैकी वर्चस्व असलेला आणि विशेष म्हणजे बहुतेक आमदार अजित पवार यांच्या विचाराचे असल्याने पार्थ पवार यांच्यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघाची चाचपणी सुरू आहे. त्यात आता पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त करून स्थानिक कार्यकर्त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात जागोजागी पार्थ पवार यांचे बॅनर्स लावल्याने पुन्हा एकदा त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT