Latest

Parliament Winter Session : जुन्या प्रस्तावावरून १२ खासदार निलंबित

Arun Patil

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Parliament Winter Session ) पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. परंतु, पावसाळी अधिवेशनात सभागृहात घडलेला अभूतपूर्व गोंधळ लक्षात घेता राज्यसभा सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. शिवसेनेचे अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदींचाही त्यात समावेश आहे. या खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशन यामध्ये सहभागी होता येणार नाही.

या खासदारांमध्ये काँग्रेसचे सहा, टीएमसी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, तर सीपीएम आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत 11 ऑगस्ट रोजी मोठा गदारोळ झाला होता. शेतकरी आंदोलन आणि इतर अनेक मुद्द्यांवरून राज्यसभेत या 12 खासदारांनी गोंधळ घातला होता.

खासदारांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर कागदपत्रे फेकली आणि सभागृहातील कर्मचार्‍यांच्या टेबलवर खासदार चढले. या खासदारांवर कारवाईची मागणी केली होती. या गोंधळी खासदारांबाबतचा निर्णय नायडू यांच्याकडे प्रलंबित होता.

विरोधी पक्षांची संसद भवनासमोर निदर्शने (Parliament Winter Session )

नवी दिल्ली : शेतकर्‍यांच्या विविध मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणी करीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी सोमवारी संसद भवनासमोर जोरदार निदर्शने केली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या निदर्शनावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली. यावेळी शेतकर्‍यांच्या मागण्यांचे व सरकारच्या विरोधाचे फलक दाखविण्यात आले.

विरोधी पक्षांच्या बैठकीस तृणमूल, आप ची दांडी

अधिवेशनाची सुरुवात होत असल्याचे औचित्य साधत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीकडे तृणमूल आणि आम आदमी पक्षाने पाठ फिरवली. तृणमूलवाले त्यांची वेगळी बैठक घेत आहेत. पण लोकहिताच्या मुद्द्यावर ते काँग्रेससोबत आहेत, असा दावा नंतर खर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
दरम्यान, सोनिया गांधी यांनीही काँग्रेस खासदारांची बैठक घेत रणनीतीवर चर्चा केली.

या खासदारांवर झाली कारवाई (Parliament Winter Session )

प्रियांका चतुर्वेदी, अनिल देसाई (दोघे शिवसेना), फुलो देवी नेताम, छाया वर्मा, रिपुन बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासिर हुसेन आणि अखिलेश प्रसाद सिंग (सर्व काँग्रेस), डोला सेन, शांता छेत्री (दोन्ही तृणमूल काँग्रेस) आणि इलामाराम करीम (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), बिनॉय विश्‍वम (भारतीय कम्युनिस्ट पक्ष).

रजनी पाटील यांची मराठीत शपथ

राज्यसभेत नवनियुक्‍त राज्यसभा सदस्यांनी शपथ घेतली. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या जागेवर निवडून आलेल्या काँग्रेसच्या रजनी पाटील यांच्यासह इतर नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. रजनी पाटील यांनी मराठीतून शपथ घेतली.

यापूर्वी 2013 ते 2018 पर्यंत त्या राज्यसभेच्या सदस्य राहिल्या आहेत. पाटील यांच्यानंतर द्रमुकच्या नवनिर्वाचित सदस्य कनिमोझी एन.वी.एन. सोमू, के.आर.एन. राजेश कुमार तसेच एम. एम. अब्दुल्ला यांनी शपथ घेतली. या सर्व सदस्यांनी तामिळमध्ये शपथ घेतली. सभागृहात डीएमके सदस्यांची संख्या दहा झाली आहे. कनिमोझी या माजी केंद्रीय मंत्री एन.वी.एन. सोनू यांच्या कन्या आहेत. तृणमूलचे लुइझिन फालेरो यांनी कोकणी भाषेत शपथ घेतली. प्रमोद चंद्र मोदी यांनी 12 नोव्हेंबरला राज्यसभेचे महासचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांचा सभापतींनी सदस्यांसोबत परिचय करवून दिला.

दिवंगत खासदारांना श्रद्धांजली

तत्पूर्वी माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस तसेच पाच माजी सदस्यांना श्रद्धांजली दिल्यानंतर सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी राज्यसभा एक तासासाठी स्थगित करण्यात आली. फर्नांडिस यांनी राज्यसभेत चार वेळा कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभेचे माजी सदस्य के. बी. शानप्पा, पत्रकार चंदन मित्रा, हरीसिंह नलवा, मोनिका दास, अवनी राय या दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ऑस्कर फर्नांडिस यांच्या सन्मानार्थ सभागृहाचे कामकाज एक तासासाठी स्थगित केले.

वंदे भारत अभियानाअंतर्गत 2 लाखांहून अधिक विमानांचे उड्डाण

कोरोना महारोगराईच्या काळात सरकारने भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी तसेच भारत आणि जगाच्या विविध भागांमधील प्रवाशांच्या प्रवास सोयीसाठी वंदे भारत अभियान हाती घेतले आहे. या अभियानाअंतर्गत 31 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 2 लाख 17 हजारांहून अधिक विमाने चालवण्यात आली आहेत. तर 1.83 कोटींहून अधिक प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळाल्याची माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री डॉ. व्ही. के. सिंह यांनी सोमवारी राज्यसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तर स्वरूपातून दिली. हे कार्यान्वयन विमान कंपन्यांचे व्यावसायिक कार्यान्वयन होते आणि विमान भाडे प्रवाशांनी दिले होते.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने अभियानासाठी कोणतेही अनुदान, सहाय्य दिलेले नाही, असेही ते म्हणाले. दिल्लीतून 29 लाख 43 हजार 325 प्रवासी या अभियानाअंतर्गत परदेशात गेले. तर 27 लाख 60 हजार प्रवासी मायदेशात परतले. एकूण 57 लाख 3 हजार 325 प्रवाशांना या योजनेचा लाभ झाला. महाराष्ट्रातून 12 लाख 98 हजार 689 प्रवासी परदेशात गेले आणि 10 लाख 9 हजार 619 प्रवासी राज्यात दाखल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT