पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने फायनलमध्ये प्रवेश करून इतिहास रचला आहे. महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत फोगटने क्युबाच्या गुझमन लोपेझचा 5-0 ने पराभव केला. यासह तिने आपले भारतासाठी ऑलिम्पिक पदक निश्चित केले आहे. साक्षी मलिकनंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला कुस्तीपटू ठरणार आहे. (paris olympics 2024 indian wrestler vinesh phogat)
याआधी उपांत्यपूर्व फेरीत फोगटचा सामना युक्रेनच्या ओक्साना लिवाचशी झाला होता. भारतीय कुस्तीपटूने पहिल्या फेरीत 2 गुण मिळवत चांगली सुरुवात केली. दुसरीकडे, ओक्सानाने जोरदार प्रयत्न केले पण अनुभवी फोगटविरुद्ध गुण मिळवता आले नाहीत. दुस-या फेरीत, खडतर स्पर्धेदरम्यान, दोन्ही खेळाडूंनी 5-5 गुण मिळवले आणि अखेरीस फोगटने सामना 7-5 असा जिंकला.
तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या 29 वर्षीय विनेशने मंगळवारी (6 ऑगस्ट) आपल्या मोहिमेला सुरुवात केली आणि तिचे पदार्पण स्फोटक ठरले. तिच्या पहिल्याच सामन्यात विनेशने ऑलिम्पिक आणि 4 वेळाची विश्वविजेती जपानची युई सुसाकी हिचा पराभव करून खळबळ उडवून दिली. विनेशच्या या विजयाची कोणालाही अपेक्षा नव्हती कारण 25 वर्षीय सुसाकीने तिच्या 82 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही सामना गमावला नव्हता. विनेशकडून तिला तिच्या करिअरमध्ये पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.
विनेशने राउंड 16 सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन आणि चार वेळची विश्वविजेती जपानची युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला. या सामन्यात सुसाकी आघाडीवर होती, मात्र शेवटच्या 15 सेकंदात विनेशने बाजी पालटली. सुसाकीला तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकाही पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. टोकियो गेम्समध्ये तिने एकही गुण न गमावता सुवर्णपदक जिंकले होते.
त्यामुळे असे मानले जात होते की विनेशला पहिली फेरी पार करणे कठीण जाईल, पण कारण तिने इतिहास रचला आणि जपानी चॅम्पियन खेळाडूला आस्मान दाखवले. खरेतर तिची या सामन्यात सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सुसाकीने आपली दमदार कामगिरी दाखवत पहिल्या दोन फेरीत विनेशवर 0-2 ची आघाडी घेतली. पण विनेशने हार न मानता पलटवार केला आणि शेवटच्या 15 सेकंदात तीन गुणांची कमाई करून सामना 3-2 ने जिंकला.
फायनलमध्ये धडक मारल्यानंतर विनेशला सुवर्णपदक मिळणार की रौप्यपदक, याचा निर्णय बुधवारी 7 ऑगस्टच्या रात्री होणार आहे. विनेश फोगटने 2016 मध्ये रिओ दि जानेरो येथील ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले होते. परंतु, दुखापतीमुळे तिला पहिल्याच सामन्यातून बाहेर पडावे लागले होते. यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपूर्वीच तिचा पराभव झाला होता. आता पॅरिसमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करून ती ऑलिम्पिक उपांत्य फेरी गाठणारी भारतातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे.