पुढारी ऑनलाईन डेस्क : PR Sreejesh Retirement : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले आहे. गुरुवारी (8 ऑगस्ट) झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. भारतीय संघाच्या चमकदार कामगिरीत गोलरक्षक पीआर श्रीजेशने महत्त्वाची भूमिका बजावली. करिअरच्या शेवटच्या स्पर्धेत खेळताना तो भारतीय गोलसमोर पहाडासारखा उभा राहिला आणि अनेकवेळा प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण परतवून लावले. पदकाचा रंग बदलण्याचे त्याचे स्वप्न जरी भंगले असले तरी पण त्याने हार न मानली नाही. देशासाठी सलग दुसरे कांस्य पदक जिंकण्यासाठी तो सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढला. परिणामी भारतीय संघाने पॅरिसमध्ये विजयी तिरंगा फडकवला. श्रीजेशसाठी हा संस्मरणीय विजयी निरोप ठरला.
हा सामना भारतीय चाहत्यांसह संघाचा 36 वर्षीय गोलकीपर पीआर श्रीजेशसाठी सर्वात खास होता. श्रीजेशचा हा शेवटचा सामना होता. स्पेनला पराभूत केल्यानंतर श्रीजेशने हेल्मेटला नतमस्तक केले आणि त्यानंतर गोलपोस्टवर चढून विजय साजरा केला. यानंतर हरमनप्रीमने श्रीजेशला खांद्यावर घेऊन मैदानात फिरवले. संघ सहका-यांनी श्रीजेशला साष्टांग नमस्कार घातला. उत्साही मुलाला ऐतिहासिक निरोप मिळाला.
कांस्यपदकाच्या लढतीत गोलरक्षक श्रीजेशची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. सामन्यादरम्यान स्पॅनिश खेळाडूंनी अनेक वेळा आक्रमणे केली, मात्र भारतीय गोलरक्षकाने गोल होऊ दिले नाही. यामुळेच संघाने कांस्यपदकावर कब्जा करण्यात पुन्हा यश आले. यापूर्वीही टोकियो ऑलिम्पिकबद्दल त्याची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली होती.
भारताची शेवटची आशा कांस्यपदकाच्या लढतीत होती आणि संघाने देशाला निराश केले नाही. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले. याशिवाय गोलरक्षक पीआर श्रीजेशनेही विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 58व्या मिनिटाला एक गोल वाचवला. यानंतर सामन्याच्या शेवटच्या क्षणी दोन पेनल्टी कॉर्नर वाचवले. अशाप्रकारे भारताची भिंत म्हटल्या जाणाऱ्या श्रीजेशने देशासाठी शेवटचा सामना खेळताना 3 महत्त्वाचे गोल वाचवले.
टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक.
आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदक.
आशियाई इनडोअर गेम्समध्ये कांस्यपदक.
आशिया कपमध्ये रौप्यपदक.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन रौप्य पदके.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन रौप्यपदके.
श्रीजेश हा केरळ सरकारच्या सामान्य आणि उच्च शिक्षण विभागातील सहसंचालक (मुख्य क्रीडा संघटक) म्हणून कार्यरत आहे. त्याला 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय 2021 मध्ये त्याला भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान खेलरत्न पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. तो 2022 मध्ये वर्ल्ड गेम्स ॲथलीट ऑफ द इयर पुरस्काराचा मानकरीही ठरला आहे.
2006 मध्ये कोलंबो येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेद्वारे श्रीजेशने वरिष्ठ भारतीय संघात पदार्पण केले. पण एड्रियन डिसोझा आणि भरत छेत्रीसारख्या वरिष्ठ गोलरक्षकांमुळे त्याला 2011 पर्यंत संघात कायमस्वरूपी स्थान मिळू शकले नाही. 2011 पासून तो संघाचा अविभाज्य भाग बनला आणि 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध दोन पेनल्टी स्ट्रोक वाचवून तो स्टार बनला. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. 336 आंतरराष्ट्रीय सामने त्याच्या कर्तृत्वाची साक्ष देतात. यादरम्याने त्याने देशासाठी ऑलिम्पिक, विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई, राष्ट्रकुल या स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले.