पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympics 2024 Indian Boxers : पॅरिस ऑलिम्पिकला काही दिवस उरले आहेत. फ्रान्सच्या राजधानीत होणाऱ्या या जागतिक क्रीडा मेळाव्यात भारतीय खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला 7 पदके जिंकण्यात यश आले होते. ही पदकसंख्या दुहेरी आकड्यापर्यंत नेण्याचे यंदाचे टार्गेट आहे. त्यात बॉक्सर्सची भूमिका महत्त्वाची ठरेल. त्यामुळे सर्वांच्या नजरा बॉक्सिंग स्पर्धेकडेही खिळल्या आहेत. भारतातर्फे या क्रीडा प्रकारात पुरुष आणि महिला खेळाडूंसह एकूण 6 खेळाडू भाग घेत आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे 2 पुरुष आणि 4 महिला बॉक्सर पदकासाठी विजयी ठोसा लगावण्यास सज्ज आहेत. पुरुष खेळाडूंमध्ये अमित पंघाल (51 किलो), निशांत देव (71 किलो) हे चमक दाखवतील. तर महिला बॉक्सरपटूंमध्ये लोव्हलिना बोर्गोहेन (75 किलो), निखत जरीन (50 किलो), प्रीती पवार (54 किलो), जस्मिन लॅम्बोरिया (57 किलो) या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देतील.
जरीनने 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून ऑलिम्पिक कोटा जिंकला. तिला थायलंडच्या रक्सत चुथामात विरुद्ध पराभव पत्करावा लागला परंतु पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी उपांत्य फेरीपर्यंत मजल पुरेशी ठरली होती. 28 वर्षांची जरीन दोन वेळची जागतिक चॅम्पियन आहे. तिने 2022 आणि 2023 मध्ये बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सलग दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. जरीन यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे, ज्यामुळे तिच्याकडून ऑलिम्पिक पदकाची आशा आहे. तिने फेब्रुवारीमध्ये बुल्गेरियामध्ये खेळल्या गेलेल्या स्ट्रॅन्डजा मेमोरियल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. तर गेल्या महिन्यात कझाकिस्तान येथील एलोर्डा चषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरले होते.
प्रिती पवारने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानच्या झैना शेकेरबेकोवा विरुद्ध विजय मिळवून ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. उपांत्य फेरीत तिला चीनच्या युआन चांगने पराभूत केले. ज्यामुळे प्रितीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत 35व्या क्रमांकावर असलेली प्रिती ऑलिम्पिकमधील भारतीय बॉक्सर्सच्या यादीत सर्वात तरुण खेळाडू आहे.
लोव्हलिना सध्या जागतिक क्रमवारीत 4 व्या स्थानावर आहे. तिने चेक रिपब्लिकमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रां प्रिक्स 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले. बॉक्सिंग जगतात तिचे नाव लोकप्रिय झाले आहे. तिच्या खात्यात एक ऑलिम्पिक कांस्यपदक आणि तीन जागतिक चॅम्पियनशिप पदके आहेत. पदकांची ही यादी लोव्हलिनाच्या जागतिक स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीची क्षमता दर्शवते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने 69 किलो गटात कांस्यपदक जिंकले होते पण यंदा ती पॅरिसमध्ये 75 किलो गटाच्या बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणार आहे. वजनी गट बदलून ती आपल्या पदकाचा रंग बदलण्यात यशस्वी होईल का? याकडे भारतीय चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
अमित पंघालने बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (BFI) मूल्यमापन प्रणालीमुळे भारतीय बॉक्सिंग संघातील स्थान गमावले होते. त्यामुळे त्याच्यासमोर पॅरिसचे तिकीट मिळवण्यात अनेक अडचणी होत्या. असे असते तरी त्याने आव्हानांना सामोरे जात बँकॉकमधील जागतिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेत चीनच्या लिऊ चुआंगचा 5-0 असा पराभव केला आणि ऑलिम्पिक कोटा मिळवला. पंघालचे हे दुसरे ऑलिम्पिक आहे. यापूर्वी त्याने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. मात्र त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याच्या नावावर कॉमनवेल्थमध्ये रौप्य आणि सुवर्णपदक, जागतिक स्पर्धेत रौप्य, आशियाई स्पर्धेत सुवर्ण, आशियाई स्पर्धेत कांस्य, रौप्य आणि सुवर्णपदक आहे.
बँकॉकमधील जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निशांतने पुरुष बॉक्सिंगमध्ये भारतासाठी पहिला कोटा मिळवला. कोटा लढतीत त्याने वासिल सेबोटारीचा 5-0 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या निशांतचे पहिले ऑलिम्पिक पदक मिळवण्याकडे लक्ष असेल. निशांतने 2023 च्या बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानावर असलेली जास्मिन लांबोरिया ही अलीकडेपर्यंत ऑलिम्पिक पात्रतेच्या रिंगणातही नव्हती. पण जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेने (WADA) परवीन हुडाचे निलंबन केल्यामुळे जास्मिनला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तिने जूनमध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मालीच्या मरीन कामाराचा पराभव केला आणि संधीचे सोने केले.
बॉक्सिंगमध्ये भारताला गेल्या चार ऑलिम्पिकपैकी तीनमध्ये पदक मिळवता आले आहे. यातील शेवटची दोन पदके मेरी कोम आणि लोव्हलिना बोरगोहेन या महिला बॉक्सिंगपटूंनी जिंकली आहेत. यावेळी लोव्हलिनासह निकत जरीनकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंद्र कुमारने भारतासाठी बॉक्सिंगमधील पहिले पदक जिंकले होते. त्यावेळी विजेंद्रने पुरुषांच्या 75 किलो गटात कांस्यपदक जिंकले होते. 2021 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचाही समावेश करण्यात आला. त्यावेळी महिला बॉक्सर एमसी मेरी कोमने इतिहास रचत पदकावर नाव कोरले. मेरी कोमनेही कांस्यपदक जिंकले. यानंतर 2016 मध्ये या स्पर्धेत देशाला एकही पदक मिळाले नाही, मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये लोव्हलिनाने भारताला बॉक्सिंगमध्ये तिसरे पदक मिळवून दिले. मात्र, तिलाही कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले होते.
1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सात भारतीय बॉक्सर प्रथमच रिंगमध्ये उतरले होते, यामध्ये बिनय बोस, जेनी रेमंड, मॅक जोकिम, रॉबर्ट क्रॅन्स्टन, जॉन नटॉल, रॉबिन भट्ट आणि बाबू लाल यांचा समावेश होता. बाबू लालने बँटमवेट प्रकारात पाकिस्तानच्या ॲलन मॉन्टेरोचा पराभव करत ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिला सामना जिंकला होता. मात्र, पुढील फेरीत बाबू लाल पराभूत झाले.
1904 च्या सेंट लुईस (अमेरिका) ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा बॉक्सिंगचा समावेश करण्यात आला. पण 1912 साली स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे आयोजित ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगला वगळण्यात आले. स्वीडिश कायद्याने या खेळावर बंदी घातली होती. त्यामुळे हा खेळ ऑलिम्पिकचा भाग नव्हता. 2012 (लंडन)पासून महिला बॉक्सिंग देखील ऑलिम्पिकचा भाग बनले.