पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympics Deeksha Dagar : पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय महिला गोल्फर दीक्षा डागर हिच्या कारला अपघात झाला आहे. तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा आहेत मात्र गंभीर दुखापत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दिक्षा डागर 7 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महिला गोल्फ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पॅरिसला पोहोचली आहे. तत्पूर्वी, तिच्या कारचा पॅरिसमध्ये 30 जुलै रोजी संध्याकाळी अपघात झाला. दिक्षाच्या पाठीला दुखापत झाली आहे. मात्र ती बरी असून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्फ स्पर्धेत भाग घेणार आहे. अपघातावेळी कारमध्ये दिक्षाच्या कुटुंबातील चार सदस्य उपस्थित होते. आईच्या कंबरेला दुखापत झाली असून भावाला किरकोळ दुखापत झाली. तर वडील आणि दिक्षा यांना दुखापत झाली नाही. आई सध्या रुग्णालयात दाखल आहे.
हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील 23 वर्षीय दीक्षाने 2019 मध्ये तिच्या व्यावसायिक गोल्फ करिअरला सुरुवात केली. ती डेफलिम्पिक चॅम्पियन असून पॅरिसमध्ये आपल्या करिअरमधील दुस-या ऑलिंपिकमध्ये खेळत आहे. दीक्षा डागरने गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता.
दिक्षा डागर ही ऑलिम्पिकच्या इतिहासातील काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना जन्मापासूनच ऐकण्याची समस्या आहे. 2017 च्या डेफलिम्पिकमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व करून रौप्य पदक जिंकले होते. ती अदिती अशोक नंतर लेडीज युरोपियन टूर जिंकणारी दुसरी भारतीय गोल्फर आहे.
दीक्षाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणतेही पदक जिंकले नसले तरी तिने ऐतिहासिक कामगिरी नक्कीच केली होती. तिने 2017 मध्ये 'डेफलिम्पिक'मध्ये भाग घेतला होता, तर 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन, डेफलिम्पिक आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी ती जगातील पहिली ॲथलीट बनली. तिच्या व्यतिरिक्त अदिती अशोक देखील पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.