न्यूयॉर्क : मानवाचे थ्री-डी अवतार फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत. आता अशा अवतारांचा प्रवेश मेडिकल सायन्सच्या क्षेत्रातही होऊ लागला आहे. कॅलिफोर्नियामध्ये एक लकवाग्रस्त (पॅरालाईज्ड) महिला अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल अवतारात बोलू लागली. या तंत्रज्ञानाने महिलेच्या ब्रेन सिग्नल्सना शब्द आणि फेस एस्कप्रेशन्स म्हणजेच चेहर्यावरील हावभावांमध्ये रूपांतरीत केले.
आतापर्यंत पॅरालाईज्ड रुग्णांना स्लो स्पीच सिंथेसायजरवर अवलंबून राहावे लागत होते; पण या नव्या तंत्रज्ञानाने अशा रुग्णांना लाभ होईल जे पक्षाघात किंवा तत्सम आजारामुळे चालण्या-बोलण्यात सक्षम राहत नाहीत. नव्या अवताराचे हे तंत्र 'ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस' (बीसीआयएस) सारखे आहे. ते मेंदूत होणार्या हालचालींना कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दाखवते. सोप्या शब्दात सांगायचे तर स्लो स्पीच सिंथेसायजरमध्ये डोळ्यांना किंवा चेहर्यांच्या हावभावांना ट्रॅक करून अनुकूल अशा योग्य शब्दांचे उच्चारण (व्हर्बल साऊंड जनरेशन) केले जाते. अर्थात याच्याही काही मर्यादा आहेतच. त्यामुळे अशा तंत्राने केली जाणारी बातचित ही सामान्य लोकांमध्ये घडणार्या बातचित किंवा संवादासारखी आहे असे म्हणता येत नाही.
नव्या तंत्रज्ञानात मानवाच्या हावभावांना नियंत्रित करणार्या मेंदूच्या एका भागात इलेक्ट्रोड बसवले जातात. त्यामुळे मेंदूत होणार्या इलेक्ट्रिकल अॅक्टिव्हिटीजना समजून डिजिटल रूपातील बोलणे व चेहर्यावरील हावभावांमध्ये त्यांचे रूपांतर केले जाते. 47 वर्षांच्या अॅनला अठरा वर्षांपूर्वी ब्रेनस्टेम स्ट्रोक आला होता. त्यामुळे ती पॅरालाईज्ड झाली होती. ती बोलूही शकत नव्हती आणि टाईपही करू शकत नव्हती. अठरा वर्षांपासून ती मुव्हमेंट-ट्रेकिंग तंत्राच्या माध्यमातून संवाद साधत आली आहे. मात्र, हे तंत्र अतिशय मंद गतीचे आहे. त्यामध्ये एका मिनिटात केवळ चौदा शब्दच ती निवडू शकत होती.
सध्या नव्या तंत्रज्ञानाचे तिच्यावर परीक्षण करण्यात आले. त्यावेळी कॉम्प्युटर स्क्रीनवर तिचा डिजिटल किंवा 'एआय अवतार' दिसून आला. तिच्या मेंदूतील सिग्नल्स आणि चेहर्यावरील हावभाव समजून स्क्रीनवर दिसत असणारी थ्री-डी महिला बोलत होती. ती जो विचार करीत आहे तसेच स्क्रीनवरील महिला बोलत आहे का, हे अॅनला विचारून त्याची पुष्टी केली गेली. अॅनने आनंदाने 'हो' असे म्हणून त्याची पुष्टी केली! त्यावरून हा प्रयोग यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या टीमने अतिशय पातळ स्तरावर 253 इलेक्ट्रोड सेट केले. त्यानंतर त्यांना मेंदूच्या एका खास भागात प्लँट केले. याच भागाच्या सहाय्याने माणूस बोलतो किंवा हावभाव दर्शवतो.
या इम्प्लँटेशननंतर मेंदूत बनणारे नवे सिग्नल्स कोणत्याही ध्वनीवर कशी प्रतिक्रिया देतात त्याचा छडा लावण्यासाठी डॉक्टरांनी कॉम्प्युटरच्या आटिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अल्गोरिदमवर काम केले. कॉम्प्युटरने 39 वेगळे साऊंडस् शिकून घेतले. तसेच एका 'चॅटजीपीटी'सारख्या लँग्वेज मॉडेलने मेंदूच्या नव्या सिग्नल्सचे रूपांतर वाक्यांमध्ये केले. परीक्षणावेळी 500 वाक्यांमध्ये 28 टक्के चुकीचे शब्द निघाले. या तंत्राच्या मदतीने एका मिनिटात 78 शब्द निर्माण करण्यात आले. सर्वसाधारणपणे माणूस एका मिनिटात 110 ते 150 शब्द बोलतो. सॅन फ्रान्सिस्कोच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील प्रा. एडवर्ड चांग यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.