file photo 
Latest

कंपनीच्या ठेकेदारीवरून खेड सिटीत पुन्हा दहशत; अधिकाऱ्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण

अमृता चौगुले

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : सेझ मधील खेड सिटीत कंपनीच्या ठेकेदारीवरून अधिकाऱ्याला (सुपरवायझर) अलिशान गाड्या लावून फिल्मी स्टाईलने रस्त्यात अडवत बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारदारांनी म्हटले आहे. घरात एका पक्षाचे तालुकास्तरीय पद व दावडी गावचे माजी सरपंच असलेल्या संतोष गव्हाणे यांचा तक्रार दाखल झालेल्या पाच जणांमध्ये समावेश आहे. खेड सिटीतील निमगावच्या हद्दित मॅक्सीऑन व्हील इंडिया प्रा. लि. कंपनी आहे.

कंपनीच्या ट्रान्सपोर्ट ठेकेदारीवरून हा वाद व अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांनी व्यक्त केला आहे. अधिक माहिती अशी कि, मारहाण करण्यात आलेले अधिकारी ड्युटी संपवुन सायंकाळी पावणेसहा वाजता घरी भोसरी येथे दुचाकीवरून निघाले होते. कंपनीच्या मेनगेटपासुन ५०० मीटर अंतरावर रस्त्यात आल्यावर त्यांच्या मोटारसायकलला ब्रिझा कार आडवी घालुन थांबविले. त्याचवेळी एक इनोव्हा कार ही मोटार सायकलच्या मागे येवुन थांबली.

इनोव्हा कारमधुन सुनिल गव्हाणे, संतोष गव्हाणे व दोन अनोळखी युवक उतरले. सुनिल गव्हाणे याने माझ्यापाशी येवुन ' तु कंपनीत का लुडबुड करतोस, तु माझी गाडी बाहेर का पाठवली? असे म्हणुन शिवीगाळ करण्यास सुरवात केली. ब्रिझा कारमधुन उतरलेल्या व्यक्तीने हेल्मेट काढायला लावले. हेल्मेट जमीनीवर आपटुन ते तोडुन नुकसान केले. त्यानंतर संतोष गव्हाणे यांनी हातात काठी घेवुन काठीने मोटार सायकलवर मारुन नुकसान केले. संतोष गव्हाणे याने हातातील काठीने अंगावर, हातांवर, पायांवर मारुन आत्तार यांना जखमी केले. सुनिल गव्हाणे याने हातातील दगडाने छातीत मारले. तसेच इतर तिघाजणांनी हाताने व बुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर संतोष गव्हाणे याने हातात दगड घेवुन मोटारसायकल चालु करायला लावुन ' तु परत कंपनीत यायचे नाही आणि तु जर पोलिस स्टेशनला तक्रार दिली तर तुला जीवे मारुन टाकु अशी धमकी दिली. असे अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी सुनिल गव्हाणे, संतोष गव्हाणे (दोघे रा. दावडी ता.खेड) व इतर ३ अनोळखी युवकां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिस निरीक्षक विजयसिंह चौहान अधिक तपास करीत आहेत.

पोलीसांसमोर आव्हान
खेड सिटीत असलेल्या कंपनीत ठेकेदारीवरून गेल्या काही महिन्यांत गंभीर मारहाण, खुन,खुनाची धमकी असे प्रकार वारंवार घडत आहेत. येथील दहशत मोडीत काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

फक्त चौकशी केली
कंपनीत आमच्या नावे अधिकृत ठेकेदारी आहे. मात्र संबंधित व्यक्ती अतिरिक्त मागणी करुन भरायला गेलेली वाहने भरायला टाळाटाळ करीत होते. काही वेळा गाड्या परत पाठवीत होते. काल कंपनी गेटवर थांबुन फक्त विचारणा केली.

                                                संतोष गव्हाणे, माजी सरपंच, दावडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT