पालघर; नविद शेख : वैतरणा खाडी पात्रात आलेल्या शार्क माशाचा मंगळवारी (दि. १३) रात्री ओहोटीच्या वेळी खाडी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने उघड्यावर पडून मृत्यू झाला. शार्क माशाने हल्ला करून जखमी केलेल्या तरुणाचा पाय निकामी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मृत शार्क मासा मनोर वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून ताब्यात घेत डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या वाइल्ड लाइफ रेस्क्यू पथकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मृत शार्क माशांची लांबी 2.95 मीटर असून जेसीबी मशिनच्या साहाय्याने मृत शार्क माशाला खाडी पात्रातून बाहेर काढण्यात आले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास वाइल्ड लाइफ रेस्क्यू पथकाने शार्क माशाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर हा मासा डहाणू येथे नेण्यात आला. संरक्षित प्रजाती असलेला शार्क मासा वनविभागाच्या अनुसूची एकमध्ये मोडत असल्याने शार्क माशाच्या मृत्यू प्रकरणी मनोर वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून वन गुन्हा (POR) दाखल करण्यात आला आहे.
समुद्राच्या खाऱ्या आणि खोल पाण्यात वास्तव्य करणारा शार्क मासा असून भरकटल्याने भरतीच्या वेळी खाडी पात्रात पोहोचल्याचा अंदाज वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी यांनी वर्तवला आहे. रात्रीच्या वेळी मृत शार्क माश्याची पाहणी केली असता माशाचे वजन एक ते दीड टन असल्याची माहिती त्यांनी दिली. बुधवारी सायंकाळी पशुवैद्यकीय अधिकारी,वनविभागाने अधिकारी आणि मानद वन्यजीव रक्षकांच्या उपस्थितीत मृत माशाचे शवविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती दिली.
मंगळवारी (दि. १३) सायंकाळी वैतरणा खाडी पात्रात मासेमारीसाठी गेलेल्या गायकवाड डोंगरी येथील हितेश सुरेश गोवारी तरुणावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. गुडघ्या खालच्या पायाचा लचका तोडल्याने अती रक्तस्त्राव होऊन हितेश गंभीर जखमी झाला होता. मनोरच्या आस्था हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर केंद्र शासित प्रदेश सिल्वासा येथील विनोबा भावे रुग्णालयात पाठवण्यात आले होते. सद्यस्थितीत त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
शार्क माशाने घेतलेल्या चाव्यामुळे हितेश गोवारी याचा पाय निकामी झाला आहे. शार्क माशाचा हल्ल्यामुळे त्याला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वाघ, सिह, हत्ती रान गवा,जंगली कुत्रे आणि अस्वला सारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसानभरपाई बाबत तरतूद आहे परंतु शार्क माशाचा हल्ल्यात नुकसानभरपाई देण्याबाबत तरतूद तपासली जात असल्याची माहिती मनोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव सातपुते यांनी दिली.
टेन ग्रामपंचायत हद्दीतील सायलेंट रिसॉर्ट लगतच्या महामार्गाच्या पुलापर्यंत वैतरणा खाडीचे शेवटचे टोक आहे. साये गावाच्या हद्दीपासून सायलेंट पर्यंतच्या भागात खाडी पात्र उथळ आणि खडकाळ आहे. मनोर आणि दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक ग्रामस्थांनी मासेमारी करण्यासाठी खाडी पात्राच्या उथळ भागात दगडाचे बांध घातले आहेत. जाळे आणि लाकडी काठीला बांधलेल्या गळाचा वापर करून खाडी पात्रात ओहोटीच्या वेळी मासेमारी केली जाते.
खाडी पात्रात खाजरी,शिंगाली आणि कोळंबी जातीचे मासे मिळत असल्याची माहिती स्थानिक मासेमारी करणाऱ्यांनी दिली. खाडीत मासेमारी करताना कमाल पाच ते दहा किलो वजनाचे मासे जाळ्यात भेटत असताना महाकाय शार्क माशाचा वावर खाडी पात्रात आढळल्याने मासेमारी करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा