Latest

PAKvsZIM T20WC: वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर पडणार! झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवाने ओढवणार नामुष्की

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : PAKvsZIM T20WC : पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या लो-स्कोअरिंग थ्रिलरमध्ये झिम्बाब्वेने ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा एका धावेने पराभव करून क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग खूपच कठीण झाला असून ते आता स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर झिम्बाब्वेने दोन सामन्यातील पहिल्या विजयासह आपल्या आशा जिवंत ठेवल्या. संघाच्या खात्यात आता तीन गुण आहेत. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 8 गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आणि त्यानंतर पाकिस्तानला 20 षटकांत 8 बाद 129 धावांवर रोखले.

पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव…

झिम्बाब्वेने दिलेल्या 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातही खूपच खराब झाली. संघाने 23 धावांच्या स्कोअरवर कर्णधार बाबर आझम (4) आणि मोहम्मद रिझवान (14) या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. पाकिस्तानला तिसरा धक्का इफ्तिखार अहमद (5) याच्या रूपाने 36 धावांवर बसला. यानंतर शान मसूद (44) आणि शादाब खान (17) यांनी चौथ्या विकेटसाठी 36 चेंडूत 52 धावांची भागीदारी करत पाकिस्तानला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर लगेचच सिकंदर रझाने आधी शादाब आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हैदर अलीला (0) बाद करून पाकिस्तानला सलग दोन धक्के दिले. त्यानंतर रझाने त्याच्या पुढच्याच षटकात मसूदला यष्टीचीत करून झिम्बाब्वेला मोठे यश मिळवून दिले. मसूदने 38 चेंडूत तीन चौकार मारून 44 धावा केल्या. शेवटच्या तीन षटकात पाकिस्तानला विजयासाठी 29 धावांची गरज होती, पण संघ एका धावेने विजयापासून दूर राहिला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने चार षटकांत 25 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय ब्रॅड इव्हान्सने दोन विकेट्स घेतल्या. (PAKvsZIM T20WC)

शेवटच्या षटकाचा थरार

शेवटच्या 6 चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी 11 धावांची गरज होती. ब्रॅड इव्हान्स गोलंदाजीसाठी आला. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नवाजने लाँग ऑफच्या फटका मारून तीन धावा घेतल्या. चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल असे वाटत होते पण झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षकाने उत्तम क्षेत्ररक्षण केले आणि एक धाव वाचवली. पण त्यानंतर वसीमने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर तिस-या चेंडूवर 1 धाव चोरली. तर पुढचा चेंडू डॉट गेला. ब्रॅड इव्हान्सने आपल्या चतुराईने पुढच्या चेंडूवर नवाजला फटका मारण्यास उसकावले आणि त्याची विकेट घेतली. मिड ऑफला त्याचा झेल इर्विनने घेतला. अखेर शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. शाहीन आफ्रिदी क्रिझवर होता. शाहीनने ब्रॅडचा शेवटचा चेंडू मीडऑनला फटकावला आणि दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. पण दुसरी धाव घेताना शाहीन धाव बाद झाला. अशा प्रकारे झिम्बाब्वेने रोमांचक सामन्यात झुंझार विजय मिळवला. (PAKvsZIM T20WC)

अशा पडल्या पाकच्या विकेट्स…

पाकिस्तानची पहिली विकेट

131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची पहिली विकेट अवघ्या 13 धावांवर पडली. कर्णधार बाबर आझम 9 चेंडूत 4 धावा काढून बाद झाला. ब्रॅड इव्हान्सच्या चेंडूवर रायन बर्लेने त्याचा झेल टिपला. चार षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एका विकेटवर 20 होती.

रिझवानही पॅव्हेलियनमध्ये परतला

बाबर आझमनंतर मोहम्मद रिझवानही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 16 चेंडूत 14 धावा केल्या. मुजारबानीचा चेंडू त्याच्या बॅटला लागून स्टंपवर गेला. पुन्हा एकदा पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाजांनी निराशा केल्याने पाकिस्तानला विजय मिळवून देण्याची जबाबदारी मधल्या फळीवर आली आहे. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने दोन गडी गमावून 28 धावा केल्या.

इफ्तिखार अहमद फेल…

36 धावसंख्येवर पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. भारताविरुद्ध तडाखेबाज फलंदाजी करणारा इफ्तिखार अहमदचा यावेळी नवख्या झिम्बाब्वेच्या गोलंदाजासमोर टीकाव लागला नाही. तो 10 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. जोंगवेच्या गोलंदाजीवर चकाबवाने इफ्तिखारचा झेल पकडला.

रझाच्या फिरकीची जादू…

शादाब खान आणि शान मसूद यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि पाकिस्तानचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण 88 धावसंख्येवर शादाब खान बाद (14 चेंडूत 17 धावा) झाला. त्याला रझाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याच षटकात हैदर अलीला माघारी धाडण्यात रझाला यश आले. हैदर शुन्यावर बाद झाला. पाकिस्तानसाठी मोठा धक्का बसला तो मसूदच्या रुपाने. कारण मसूद एका बाजूने पाकचा डाव लढवत होता. मात्र तो 44 धावांवर असताना रझाने आपल्या 15.1 व्या षटकात फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यावेळी पाकची धावसंख्या 6 बाद 94 होती.

तत्पूर्वी, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत झिम्बाब्वेला 8 विकेट्सवर केवळ 130 धावांमध्ये रोखले. पाकिस्तानसाठी मोहम्मद वसीम हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने आपल्या चार षटकात 24 धावा देत चार बळी घेतले. त्यांच्याशिवाय शादाब खानने चार षटकांत 23 धावा देत तीन खेळाडू बाद केले. झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सने 31 धावांचे योगदान दिले आणि कर्णधार क्रेग इर्विन आणि ब्रॅड इव्हान्सने 19-19 धावांचे योगदान दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT