पुढारी ऑनलाईन डेस्क : देशासह संपूर्ण जगासाठी रविवारी अत्यंत वाईट बातमी आली. संगीत क्षेत्रातील दिग्गज स्वरकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. गेले अनेक दिवस त्या रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत होत्या. त्यांच्या निधनाने भारतच नव्हे तर संपूर्ण जग दु:खी झाले आहे. लता मंगेशकर यांचे जगभरात चाहते होते. भारताकडून जेवढे प्रेम मिळत असे, तेवढेच प्रेम पाकिस्तानी त्यांच्यावर करायचे. आज लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पाकिस्ताननेही त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ट्विटरवर लिहिले की, ' एकमहान व्यक्तिमत्व नाही राहिले. लता मंगेशकर या संगीत विश्वावर अनेक दशके राज्य करणाऱ्या विख्यात राणी होत्या. संगीत विश्वात त्यांच्यासारखे कोणीच नव्हते. त्यांचा आवाज येणाऱ्या काळातही लोकांच्या हृदयावर राज्य करत राहील. लता मंगेशकर यांचे पाकिस्तानी चाहते ट्विटरवर सुरू असलेल्या #RIPLataMangeshker ट्रेंडला श्रद्धांजली वाहत आहेत.
शकील अहमद या पाकिस्तानी चाहत्याने लिहिले की, 'दिग्गज लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. ईश्वर त्यांना पुढील जगात शांती देवो. शांतीची आशा प्रेम.. भारत…'. पाकिस्तानी पत्रकार आमिर रझा खान यांनी लता मंगेशकर यांचे बालपणीचे फोटो शेअर केले आणि लिहिले, 'हृदयद्रावक, कोणाला माहित होते की ही छोटी मुलगी संगीत जगताची राणी बनेल. लताजी तुम्ही आमच्या काळातील खरे महान व्यक्तिमत्व आहात. RIP भारत, पाकिस्तान आणि जगभरातील संगीतप्रेमींची राणी आहात.'
पाकिस्तानच्या कामरान रहमतने लिहिले, 'मधुर आवाज शांत झाला आहे. लतादीदी पुन्हा नूरजहाँना भेटल्या. आणखी एका पाकिस्तानी चाहत्याने लिहिले, 'लता मंगेशकर भारतीय उपखंडातील सर्वात लोकप्रिय आणि महान संगीतकारांपैकी एक होत्या. लताजी नेहमी आपल्या हृदयात राहतील. रिजवान वसीर यांनी लिहिले, 'जादुई आवाजाचे युग संपले आहे. लता दीदी तुम्ही आमच्या हृदयात आहेस. पाकिस्तानकडून तुमच्यावर प्रेम आहे.
'भारतरत्न' पुरस्कारप्राप्त लता दीदींनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. जगभरात 'नाइटिंगेल ऑफ इंडिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी जवळपास पाच दशके हिंदी चित्रपटसृष्टीत स्त्री पार्श्वगायनावर राज्य केले. मंगेशकर यांनी १९४२ मध्ये वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी आतापर्यंत अनेक भारतीय भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.
याशिवाय त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. जानेवारीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर ॉ न्यूमोनिया झाला. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर व्हेंटिलेटरचा सपोर्टही काढून घेण्यात आला. पण ५ फेब्रुवारीला त्यांची प्रकृती बिघडू लागली आणि त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अखेर ६ फेब्रुवारीला 'स्वर नाइटिंगेल'ने अखेरचा श्वास घेतला.