सियालकोट/ इस्लामाबाद; वृत्तसंस्था : pakistan : पाकिस्तानीतील सियालकोट येथे एका कारखान्याच्या व्यवस्थापकाला त्याच कारखान्यातील कामगारांनी भर रस्त्यावर हातपाय तोडून जिवंत जाळून टाकले. शुक्रवारी ही भयावह घटना घडली. कारखान्याच्या मृत व्यवस्थापकाचे नाव प्रियांथा कुमारा असून, ते श्रीलंकेतील बौद्ध धर्मीय नागरिक होते. 'बाल्टिस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार प्रियांथा यांच्यावर मोहम्मद पैगंबर यांची निंदानालस्ती केल्याचा आरोप होता. घटनेनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
घटना घडली तेव्हा घटनास्थळी काही पोलिसही हजर असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पोलिसांनी कुठलाही हस्तक्षेप केला नाही. उलट बघ्याची भूमिका घेतली. प्रियांथा यांनी नुकतीच आयात व्यवस्थापक म्हणून सियालकोटमधील या कारखान्यात नोकरी सुरू केली होती. पाकिस्तानातील टी-20 संघासाठी लागणारे आवश्यक साहित्य या कारखान्यात तयार केले जाते.
आधी कारखान्यातून खेचत काढले ( pakistan )
'द डॉन'च्या वृत्तानुसार वजिराबाद रस्त्यालगत हा बहुराष्ट्रीय कारखाना आहे. कामगारांची गर्दी जमली. या गर्दीने आयात व्यवस्थापकाला कारखान्याबाहेर काढले. बेदम मारहाण केली. हातपाय तोडले. घोषणा दिल्या आणि नंतर जाळून टाकले. सियालकोटमधील पोलिस अधिकारी उमर सईद मलिक यांनी याबद्दल माहिती दिली. घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. तो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'लब्बैक'चा हात? ( pakistan )
सियालकोटमध्ये यापूर्वी 2010 मध्ये अशीच एक घटना घडली होती. गर्दीने तेव्हा दोघा भावांना जिवंत जाळले होते. ताज्या दुर्घटनेच्या व्हायरल व्हिडीओतील घोषणाबाजीचे स्वरूप ऐकल्यानंतर त्या 'पाकिस्तान तहरीक-ए-लब्बैक'चे समर्थक देतात, तशा आहेत.
हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. ज्यांनी हे दुष्कृत्य केले आहे, त्यांना क्षमा केली जाणार नाही. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.
– उस्मान बुजदार,
मुख्यमंत्री, पंजाब, पाकिस्तान