अमृतसर, वृत्तसंस्था : पंजाबातील अमृतसर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने (सीमा सुरक्षा दल) पाकिस्तानी तस्करांचे अमली पदार्थ उतरविण्याचे 2 प्रयत्न उधळून लावले. अमृतसर सेक्टरमध्ये 2 ठिकाणी केलेल्या कारवाईअंतर्गत पाकिस्तानातून ड्रोनने पाठविलेली हेरॉईनची खेप जवानांनी जप्त केली.
पाकमधून आलेले एक ड्रोन पाडण्यात तसेच पकडण्यातही जवानांना यश आले. रात्री अटारी सीमेलगत जवान गस्तीवर असताना पूल मोरात 9.35 वाजता ड्रोनचा आवाज आला. जवानांनी आवाजच्या दिशेने फायरिंग सुरू केली. ड्रोनचा आवाज बंद पडल्यानंतर परिसराची नाकाबंदी करून जवानांनी ड्रोन शोधून काढला.
एका शेतातून डीजेआय मॅट्रीस आरटीके 300 ड्रोन पडलेला होता. ड्रोनमध्ये हेरॉईन मात्र नव्हते. जवान पोहोचण्यापूर्वीच तस्कराने ते लांबविलेले होते. तस्कराला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून 3.5 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. दुसर्या घटनेत ड्रोन जवानांच्या हाती लागले नाही, पण त्याद्वारे फेकण्यात आलेली 2.2 किलो हेरॉईनची खेप जप्त करण्यात आली आहे. हेरॉईनची एकूण किंमत 40 कोटी रुपये आहे.