पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानने हाँगकाँगचा केवळ 38 धावांत ऑलआऊट करून हा सामना तब्बल 155 धावांनी जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर पाक संघाने आशिया चषक स्पर्धेची सुपर 4 फेरी गाठली आहे. पाकच्या या विजयानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्ताहन हा हायव्होल्टेज सामना पहायला मिळणार आहे.
हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 20 षटकांत 2 बाद 193 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 57 चेंडूत 78 धावा केल्या, तर फखर जमानने 41 चेंडूत 53 धावा केल्या. शेवटच्या षटकात खुशदिल शाहने तुफानी खेळी केली. त्याने अवघ्या 15 चेंडूत 35 धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ 10.4 षटकांत 38 धावांवर गारद झाला. हा पाकिस्तानचा T20 मधील सर्वात मोठा विजय आहे. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर मोहम्मद नवाजने 3 आणि नसीम शाहने 2 बळी घेतले.
यापूर्वी त्यांनी 2018 मध्ये कराची स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध 143 धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह पाकिस्तानने सुपर-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तेथे त्यांचा पहिला सामना रविवारी भारताविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. गेल्या रविवारी भारताने त्याचा पाच गडी राखून पराभव केला होता.