कोलंबो; पीटीआय : येथील प्रेमदासा स्टेडियमवर गुरुवारी यजमान श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन संघ परस्परांशी महत्त्वपूर्ण लढतीत दोन हात करणार आहेत. यात विजयी ठरलेला संघ अंतिम फेरीत भारताविरुद्ध खेळेल. त्यामुळेच या लढतीत दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' यासारखी स्थिती असणार आहे.
दोन्ही संघांचा विचार केला तर यजमान संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ मिळेल; मात्र पाकिस्तानच्या तुलनेत श्रीलंकेचा संघ कमकुवत असल्याचे दिसून येते. आधीच्या सामन्यात भारताकडून दोन्ही संघांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तरीदेखील पाकिस्तानला पत्करावी लागलेली हार लाजिरवाणी होती. त्या धक्क्यातून तो संघ कितपत सावरला आहे हे गुरुवारच्या लढतीत स्पष्ट होईल. दुसरीकडे, श्रीलंकेलाही भारताने मंगळवारी धोबीपछाड दिली आहे; मात्र श्रीलंकेने भारताला 213 धावांत गारद केले होते हेही विसरता येणार नाही. फिरकी हेच यजमान संघाचे मुख्य अस्त्र असेल, असे दिसून येते.
कोलंबोची खेळपट्टी प्रामुख्याने धावांनी ठासून भरलेली असल्याचे दिसून येते. म्हणजेच फलंदाजांचा वरचष्मा असेल. काही प्रमाणात फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकेल; मात्र वेगवान गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी मदत करण्याची शक्यता नाही. मुख्य म्हणजे गुरुवारच्या सामन्यात पावसाची शक्यता जवळपास नसल्याचा अंदाज स्थानिक हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे या सामन्यात रसिकांना उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळू शकतो.
भारताकडून स्वीकारावा लागलेला मानहानीकारक पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत बाबर आझमचा संघ आपले सगळे कसब पणाला लावेल यात शंका नाही. श्रीलंकेचा संघही भारताकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे खजिल झाला आहे. याचे उट्टे हा चमू पाकिस्तानला नमवून काढू शकतो. अर्थात, प्रत्यक्ष मैदानावर दोन्ही संघ कसा खेळ करणार, यावरच सारे काही अवलंबून आहे.
पाकिस्तान : फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आघा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ.
श्रीलंका : पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडीस (विकेटकीपर), सदीरा समाराविक्रमा, चरिथ असलांका, धनंजय डिसिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लालगे, महीश तीक्षणा, कसुन राजिथा, महीशा पथिराना.