पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्फराज अहमदच्या शतकामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानची लाज वाचली आणि सामना रोमहर्षक स्थितीत अनिर्णित राहिला. विजयासाठी 319 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ 90 षटकांत 9 बाद 304 धावा करू शकला.
किवी संघाला विजयासाठी शेवटची एक विकेट मिळवता आली नाही. अखेरीस, अबरार अहमद 7 (13) आणि नसीम शाह 15 (11) धावा करून नाबाद राहिला. सर्फराजने 118 धावांची खेळी केली आणि कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. खराब प्रकाशामुळे खेळ तीन षटके लवकर संपला. त्यामुळे पाकचा संघ पराभवापासून थोडक्यात बचावला. अन्यथा, घरच्या मैदानावर पाकिस्तानचा हा सलग तिसरा कसोटी मालिका पराभव ठरला असता.
विजयासाठी चौथ्या डावात 319 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाची सुरुवात खूपच खराब झाली. चौथ्या दिवशी एकही धावा न करता यजमान संघ 2 गडी गमावून अडचणीत सापडला होता. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पाकिस्तानला विजयासाठी 319 धावा करायच्या होत्या. तर न्यूझीलंडला सामन्यासह मालिका खिशात घालायला 8 विकेट्सची गरज होती.
शेवटच्या दिवशीही किवी गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरुंग लावला आणि त्यांचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत पाठवला. अशा स्थितीत माजी कर्णधार सर्फराज आघाडी घेतली. त्याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत एक टोक सांभाळले आणि संयमी फलंदाजी करत 135 चेंडूत कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. मात्र, संघाला विजयाकडे नेण्यापूर्वीच 118 धावा करून तो बाद झाला. शेवटी अबरार अहमद आणि नसीम शाह यांनी किवी संघाला विजय मिळवू दिला नाही.
न्यूझीलंडने पहिला फलंदाजी करत पहिल्या डावात 449 धावा केल्या. यानंतर पाकिस्तान पहिल्या डावात 408 धावांत गारद झाला. त्यामुळे किवींना 41 धावांची आघाडी मिळाली. यानंतर पाहुण्या संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 277 धावा करून दुसरा डाव घोषित केला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 319 धावांचे लक्ष्य ठेवले. अशा स्थितीत सर्फराज अहमदच्या 118 धावांच्या शतकी खेळीमुळे पाकिस्तानच्या संघाला 9 गडी गमावून 304 धावा करता आल्या. सामना अनिर्णित राहिल्याने मालिका 0-0 अशी बरोबरीत संपली.