पुढारी ऑनलाईन डेस्क : PAK vs NZ Test : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कराची येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्या न्यूझीलंडने जोरदार पलटवार केला. न्यूझीलंडने आपल्या गोलंदाजांच्या जोरावर पाकिस्तानचा पहिला डाव 438 धावांत गुंडाळल्यानंतर सलामीवीरांच्या मदतीने एकही गडी न गमावता 165 धावा केल्या. मात्र, दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानच्या पहिल्या डावातील धावसंख्येला प्रत्युत्तर देण्यासाठी न्यूझीलंड अजूनही 273 धावांनी मागे आहे. किवी समालामीवीर टॉम लॅथम (78*) आणि डेव्हॉन कॉनवे (82*) यांनी पाकच्या गोलंदाजांना घाम फोडला आणि भक्कम भागिदारी रचली. पाकिस्तानमध्ये न्यूझीलंडसाठी ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली.
तत्पूर्वी, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने पाच बाद 317 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना पहिल्या सत्राच्या पहिल्याच षटकातच मोठा धक्का बसला. कर्णधार बाबर आझम एकही अतिरिक्त धावा न जोडता 161 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, यानंतर नौमान अली आणि आगा सलमानने सातव्या विकेटसाठी 157 चेंडूत 54 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. 75 चेंडूत 7 धावा करून नौमान अली बाद झाला. तर मोहम्मद वसीम ज्युनियर 2 धावा करून माघारी परतला. यानंतर सलमानने नवव्या विकेटसाठी मीर हमजासोबत 39 धावांची तर अखेरच्या विकेटसाठी अबरारसोबत 24 धावांची छोटी पण महत्त्वाची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 438 पर्यंत पोचवली. यादरम्यान आगा सलमाननेही कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तो 155 चेंडूंत 17 चौकारांच्या मदतीने 103 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
त्यानंतर पहिल्या डावासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या लॅथम आणि कॉनवे कधी संयमी तर कधी आक्रमक खेळी करून नाबाद दीड शतकी भागीदारी रचली. ही जोडी फोडण्यासाठी पाकिस्तानी गोलंदाज हतबल झालेले दिसले. लॅथम आणि कॉन्वे या किवींच्या सलामी जोडीने पाकिस्तानच्या गोलंदाजांना अक्षरश: घाम फोडत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे किवी संघाला दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 47 षटकात बिनबाद 165 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. ते अजूनही पाकिस्तानपेक्षा 273 धावांनी मागे आहेत.