नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या विधानाचा पुनरुच्चार करत पीव्ही नरसिंह राव हे भाजपचे पहिले पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे. आज तक या वृत्त वाहिनीशी बोलताना अय्यर म्हणाले, 'होय, मी नरसिंह राव हे भाजपचे पहिले पंतप्रधान असल्याचे म्हटले होते. आम्ही निवडणूक हरल्यानंतर विरोधी पक्षाचे अधिवेशन आयोजित करण्याचे ठरवले होते. त्यासाठी एक थीम तयार करावी लागणार होते. यादरम्यान, नरसिंह राव यांनी मला काही प्रश्न केले. मुंबईत हज मंझील का आहे? हिंदूंसाठी काहीच का नाही?' असे प्रश्न विचारले होते.'
दिल्लीत 'मेमोयर्स ऑफ ए मॅव्हरिक – द फर्स्ट फिफ्टी इयर्स (1941 ते 1991)' या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी अय्यर यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत. ज्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी खळबळ माजली आहे. त्यांच्या या विधानांमुळे काँग्रेसमध्येच अस्वस्थ परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. अय्यर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव हे जातीयवादी असल्याचा दावा केला असून ते भाजपचे पहिले पंतप्रधान होते असा उल्लेख केला आहे.
पीव्ही नरसिंह राव यांनी काँग्रेस सरकारचे नेतृत्व केले होते. 1991 ते 1996 या काळात ते भारताचे पंतप्रधान होते.
आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी संवाद साधताना ते म्हणाले, पीव्ही नरसिंह राव यांनी काँग्रेसच्या तत्त्वांवर बाबरी मशीद प्रश्न सोडवला नाही. ते फक्त अडवाणीजी काय म्हणाले ते ऐकत राहिले. शेकडो साधू-संतांना बोलावून सल्लामसलत करत राहिले. जेव्हा सर्व काही झालं तेव्हा काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत राव यांनी धक्कादायक मत मांडले. ते म्हणाले की, जुन्या काळी राजा-महाराजांना काही महत्त्वाचे निर्णय घ्यायवे लागयचे तेव्हा ते हिंदू संतांशी सल्लामसलत करत असत. मीही तेच केले,' असे सांगितले. राव यांच्या त्या विधानाचा समाचार अय्यर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात घेत आहे. त्यांनी पुस्तकात म्हटलंय की, 'जुन्या काळातील साधू-संत राजे-महाराजांचे आदेश पाळायचे, पण या काळातील साधू-संतांनी आमचे ऐकले नाही. त्यांनी आक्रमक होऊन बाबरी मशीद पाडली, धर्मनिरपेक्षतेला तिलांजली दिली. ज्यामुळे भाजपला देशावर राज्य करण्याची दारे खुली झाली, असा अय्यर यांनी आरोप केला आहे.
अय्यर यांनी राव यांच्याशी 'राम-रहिम' यात्रा काढताना त्यांच्याशी झालेल्या संभाषणाचाही उल्लेख केला आहे. अय्यर म्हणतात, 'नरसिंह राव यांनी माझ्या 'राम-रहिम' यात्रेवर कोणताही आक्षेप घेतला नाही, परंतु धर्मनिरपेक्षतेच्या माझ्या व्याख्येशी ते असहमत होते. माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत काय चूक आहे? असे मी त्यांना विचारले. त्यावर राव यांनी धक्कादायक उत्तर दिले. ते म्हणाले की, मणी तुम्हाला समजत नाहीय; हा हिंदू देश आहे. त्यांच्या या उत्तर मी सुन्न झालो आणि खुर्चीवर बसतच म्हणालो की भाजपही तेच म्हणते.'