Latest

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धाचा भडका; हजारावर ठार

Arun Patil

जेरुसलेम; वृत्तसंस्था : इस्रायलने 'हमास'विरोधात युद्धाची (Israel Hamas War) अधिकृत घोषणा केली असून आपली सारी लष्करी ताकद पणाला लावत संपूर्ण गाझा पट्टी क्षेपणास्त्र व बॉम्बवर्षावाने भाजून काढायला सुरुवात केली आहे. शेकडो इमारती या हल्ल्यात भुईसपाट झाल्या असून हल्ल्यांचा जोर वाढला आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या या लढाईत 600 इस्रायली तर 400 हून अधिक पॅलेस्टिनी असे एक हजारहून अधिक लोक मारले गेले.

शनिवारी सकाळी इस्रायलवर हमासने आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला. पाच हजारहून अधिक क्षेपणास्त्रे डागली व गाझा पट्टीनजीकच्या गावांवर कब्जा केला. गोळीबाराच्या फैरी झाडल्या. या प्रकारानंतर इस्रायलने प्रतिहल्ले सुरू केले. शनिवारपासून सुरू झालेल्या इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात गाझा पट्टीवर अक्षरश: बॉम्बवर्षाव करण्यात आला. रविवारी इस्रायली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले आणि 'ऑपरेशन इंतकाम' सुरू झाले.

23 लाख लोकसंख्या असलेली गाझा पट्टी युद्धभूमी बनली असून इस्रायली लढाऊ विमानांचे ताफे एकापाठोपाठ एक बॉम्बवर्षाव करीत आहेत. हमासची कार्यालये, त्यांच्या प्रमुख नेत्यांची घरे व कार्यालये यांना टार्गेट करतानाच इस्रायलने थेट रहिवासी इमारतीही निशाण्यावर घेतल्या. गाझा शहरात एक 14 मजली इमारत कार्पेट बॉम्बिंग करून अवघ्या काही मिनिटांत भुईसपाट केली गेली; तर शेकडो घरे या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली. गाझा पट्टीत इस्रायली सैन्याने हमासच्या गुप्तचर प्रमुखाचे घर बॉम्बफेक करून बेचिराख केले. संपूर्ण गाझा पट्टीचा वीजपुरवठा करणारी केंद्रे वेचून टार्गेट करण्यात आल्याने या भागातील 23 लाख लोक विजेविना आहेत.

चकमकी सुरूच (Israel Hamas War)

गाझा पट्टी ओलांडून सिडरॉट, फार अझा, नहाल ओझ, बीरी, मेगन, सुफा या गावांतील इस्रायली वसाहतींत घुसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांसोबत इस्रायली सैन्याच्या चकमकी सुरूच आहेत. रविवारी दुपारी सिडरॉट येथील हमासने ताब्यात घेतलेल्या पोलिस ठाण्यावर इस्रायलने पुन्हा ताबा मिळवला. त्यात हमासचे 10 दहशतवादी मारले गेले.

ब्रिगेड कमांडरचा मृत्यू

कारेम शालोम येथे हमास बंडखोरांसोबत इस्रायली सैन्याच्या जोरदार चकमकी सुरू असून तेथे रविवारी नहाल ब्रिगेडचा कमांडर लेफ्टनंट कर्नल योनाथन स्टेनबर्ग यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले. रविवारी सायंकाळी गेल्या 24 तासांत मरण पावलेल्या जवानांची यादी लष्कराने जाहीर केली.

ओलिसांचा शोध सुरू (Israel Hamas War)

शनिवारी इस्रायलमध्ये घुसून 100 हून अधिक इस्रायली सैनिक व नागरिकांचे हमासच्या टोळ्यांनी अपहरण केले असून या सर्वांना गाझा पट्टीत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. हमासच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे ओलिस आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तिकडे इस्रायलने ओलिसांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सुरू केले असून त्यातील काहीजणांची सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मृत्यूचा आकडा वाढताच

शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत गाझा पट्टी आणि इस्रायलमध्ये मिळून एक हजारहून अधिक जण मरण पावले आहेत. हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 600 जण मरण पावल्याचे आणि 21 जण जखमी झाल्याचे इस्रायलने म्हटले आहे; तर इस्रायलच्या गाझामधील हल्ल्यांत आतापर्यंत 400 जण मरण पावले असून 2000 हून अधिकजण जखमी झाले आहेत. गाझा पट्टी आणि इस्रायलमध्ये मरण पावलेल्यांत 50 हून अधिक लहान मुले आहेत.

महिलांवर हमासचे अनन्वित अत्याचार

हमासने केलेल्या हल्ल्यांत इस्रायली महिलांना टार्गेट केले जात असून त्यातील एका महिलेला केसाला धरून फरफटत गाडीत कोंबतानाचा व्हिडीओ शनिवारी आला होता. पाठोपाठ हमासने गावांत घुसून अनेक महिलांवर अनन्वित अत्याचार केल्याच्या घटना समोर येत आहेत. या शिवाय लहान मुलांनाही मारण्याचे प्रकार घडत आहेत.

हिजबुल्लाचाही हल्ला

एकीकडे दक्षिण इस्रायलच्या गाझा पट्टीत सारा भडका उडाला असताना लेबेनॉनला लागून असलेल्या उत्तर सीमेवर रविवारी लेबेनॉनमधील हिजबुल्ला संघटनेने इस्रायलच्या माऊंट डोव्हवरील लष्करी ठाण्यावर क्षेपणास्त्राचा मारा केला. पाठोपाठ इस्रायली सैन्याने लेबेनॉनच्या सैन्याच्या दिशेने गोळीबार व रॉकेटचा मारा सुरू केला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून इस्रायलने त्या भागातील वसाहती रिकाम्या करण्यास प्रारंभ केला आहे. हिजबुल्लाचा कमांडर हाशेम सफीद्दीन याने आजच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना पॅलेस्टिनींच्या लढ्यासाठी हमाससोबत आमच्या संघटनेच्या बंदुका आणि रॉकेट कायम सज्ज असतील असे जाहीर केले.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हमासला फोन

शनिवारच्या हल्ल्यानंतर इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी हमास आणि इस्लामिक जिहाद या संघटनेच्या वरिष्ठांना फोन करून निर्माण झालेल्या स्थितीबाबत चर्चा केली. रईसी यांनी इस्लामिक जिहाद संघटनेचा म्होरक्या झियाद अल नखालाह आणि हमासच्या राजकीय विभागाचा प्रमुख इस्माईल हानियेह या दोघांना स्वतंत्र फोन केल्याचे इर्ना या इराणी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

हमासच्या बाजूचे देश

इराण, सीरिया, लेबेनॉन, येमेन.
हमासकडे झुकलेले देश : कतार, अरब लीग, जॉर्डन.
तटस्थ देश : सौदी अरेबिया, इजिप्त, मोरोक्को, तुर्कीये.

इस्रायलच्या बाजूचे देश

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, युक्रेन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT