शासन आपल्या दारी  
Latest

कोल्हापूर : उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 13) 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तपोवन मैदानावर सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य शासनाच्या विविध योजनांचा जनतेला लाभ देण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 75 हजार लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ या उपक्रमाद्वारे दिला जाणार आहे. त्याचा मुख्य कार्यक्रम आयटीआय-कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मंगळवारी दुपारी तीन वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे. यानंतर ते शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील. सायंकाळी चार वाजता तपोवन मैदानावर कार्यक्रम होईल. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अन्य मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमात मंगळवारी सुमारे 35 हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. प्रत्यक्षात 28 हजार लाभार्थी उपस्थित राहतील, असा अंदाज असल्याचे सांगून रेखावार म्हणाले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 35 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिला जाईल. उर्वरित लाभार्थ्यांना मंत्री, आमदार, खासदार तसेच विविध अधिकार्‍यांच्या वतीने लाभाच्या आदेशाचे वाटप केले जाईल. दिव्यांग लाभार्थी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करतील.

या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून त्याची तीन भागात विभागणी केली आहे. मुख्य मंडपात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. तत्पूर्वी सकाळी दहापासून रोजगार मेळावा, विविध शासकीय योजनांची माहिती देणारे दालन आणि महिला बचत गटांच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन सुरू राहणार आहे. तेथे आरोग्य विभागाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन केले असून तपासणीनंतर मोफत औषधेही दिली जाणार आहेत.

या उपक्रमासाठी तालुकानिहाय लाभार्थ्यांची व्यवस्था केली आहे. कार्यक्रमास्थळपासून जवळच्या अंतरावर तालुकानिहाय पार्किंगची व्यवस्था केली आहे. लाभार्थ्यांना घेऊन येणार्‍या एसटी बसेस तसेच शासकीय वाहनांचे या ठिकाणी पार्किंग केले जाणार आहे. तालुकानिहाय कलर कोड देण्यात आले आहेत. त्याच रंगाचे संबंधितांना ओळखपत्रही देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याचे रेखावार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT