Latest

काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाच्या हालचाली

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी मुंबईतल्या वायबी सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. पवारांसोबतच्या बैठकीत राज्यसभेची निवडणूक आणि उमेदवारासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील काही आमदार भाजपच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी लागणार्‍या संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठीही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

दरम्यान, हायकमांडने प्रदेश काँ ग्रेसला बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी साडेसात वाजता मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. चव्हाणांसोबत आणखी किती नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत याचा वेध या बैठकीत घेण्यात येईल. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे किती आमदारांचे संख्याबळ आहे, यावरही चर्चा करण्यात येणार आहे. 45 आमदारांमधून आता चव्हाणांनी राजीनामा दिला, तर सुनील केदार हे बँक घोटाळ्यात दोषी आढळल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. बाबा सिद्दिकी अजित पवार गटात गेल्यामुळे झिशान सिद्दिकीबाबत काँग्रेसला शाश्वती नाही. या सर्व विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहावर तोडगा काढण्याच्या आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरील पक्षांतर्गत रोष कमी करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांना पुन्हा ताकद दिली जाणार आहे, असे समजतेय. बाळासाहेब थोरातांना राज्यसभा निवडणूक आणि पक्ष संघटना बांधण्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील डॅमेज कंट्रोल आणि संघटना बांधणीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे वाढलेल्या नाराजीवर दिल्ली हायकमांडकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांचा निर्णय होणार, हे जवळपास निश्चित झाल्याचे समजते.

पक्षावर फरक नाही : वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अशोक चव्हाण राजीनाम्यावरून भाजपवर टीका केली. स्वत:च्या कामगिरीवर जिंकता येत नाही, म्हणून इतर पक्ष फोडून घर सजवण्याचे काम सुरू आहे, असा घणाघात वडेट्टीवारांनी केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसंबंधी प्रभारींशी चर्चा होणार असल्याचेही वडेट्टीवारांनी म्हटले आहे. तसेच एक नेता गेल्याने पक्षाला काहीही फरक पडत नसल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच पक्ष सोडणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला. एकनाथ शिंदेंसोबतच काँग्रेस सोडण्याचं चव्हाणांचं ठरलं होतं असा दावाही राऊतांनी केलाय. काँग्रेसमधून नेते घेऊन भाजप एकप्रकारे काँग्रेसशी युती करतंय, असा टोलाही राऊतांनी लगावलाय.

निर्लज्जपणाची सीमा असते; चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांची टीका
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : जो नेता तुमच्यासाठी कालपर्यंत भ्रष्टाचारी होता, तो नेता आता भाजपमध्ये कसा काय चालतो, असे सवाल समाजमाध्यमांतून विचारले जात होते. अगदी तोच सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला विचारला आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत, असा आरोप भाजपने वारंवार केला. त्यानंतर भाजपने अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमिरा लावला. अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखल झाले, हा कृतीचा परिणाम आहे. आता प्रश्न असा आहे की, कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले? निर्लज्जपणाचीदेखील काहीतरी एक सीमा असते, अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजपवर बोचरा वार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT