१५ वर्षीय ब्रेन डेड मुलाच्या अवयवदानामुळे अनेकांना जीवनदान! 
Latest

१५ वर्षीय ब्रेन डेड मुलाच्या अवयवदानामुळे अनेकांना जीवनदान!

रणजित गायकवाड

पंधरा वर्षीय क्षितीज नेहमीप्रमाणे सायकल खेळायला बाहेर गेला. मात्र थोडया वेळाने त्याला गरगरायला लागले. त्रास इतका वाढला की तो सायकल लिफटमध्ये टाकून तो लिफटमधून रांगतच बाहेर पडला. उपचारासाठी दाखल केले असता त्याला 'ब्रेन हॅमरेज' (मेंदुत रक्तस्त्राव) झाल्याचे कळले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अखेर क्षितीज ब्रेन डेड झाला. मात्र, घरच्यांनी धाडसाने निर्णय घेतला आणि त्याचे अवयवदान केल्याने अनेकांना जीवनदान मिळाले.

पुणे विभागातील हे यावर्षीचे 36 वे अवयव दान ठरले. क्षितीजची एक किडणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, यकृत हडपसर येथील सह्याद्री रुग्णालय, हृदय एच. एन. रिलायन्स मुंबई येथे ग्रीन कॉरिडॉर करून नेण्यात आले. एका बाजूला मुलाच्या मृत्यूचे दु:ख तर दुसरीकडे कोणाला तरी जीवदान मिळाल्याचे समाधान वडिलांनी उराशी बाळगून क्षितीजचे अंत्यसंस्कार केले.

क्षितीज हा पिंपरीतील रॉयल वर्ल्ड स्कूल' या शाळेत दहावीत शिकत होता. क्षितीजचे वडील अजय शेळके हे पिंपरी परिसरातील रहिवाशी असून पुण्यातील एका आयटी कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांची 12 वर्षांची एक छोटी मुलगी आहे. क्षितीजला आई, आजोबा, आजी, काका असे मोठे कुटुंब आहे. अगदी हृदयावर दगड ठेवून त्यांनी मुलाबाबत घडलेला प्रसंग सांगितला.

सायकल खेळताना अचानक त्याला गरगरू लागले होते. लिफटमधून रांगतच बाहेर पडताना त्याला शेजा-यांनी पाहिले त्याच्या आईवडिलांना कळवले. सुरवातीला त्याला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु त्याची परिस्थिती पाहून त्यांनी मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथून जवळच असलेल्या एका रुग्णालयात नेले, परंतु तेथे त्याच्यावर उपचार करण्याएवढे अत्याधुनिक उपकरणे नसल्याने त्यांनी आदित्य बिर्ला रुग्णालयात त्यांना पाठवले. तेथे त्याचे पहाटे दोन वाजता मेंदूचे ऑपरेशन करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्याला जहांगीर रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्याचा मेंदू मृत म्हणजे ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

परंतु, त्यातूनही सावरून वडिलांनी अवयवदानासाठी पत्नीच्या मनाची तयारी केली. कुटुंबियांतील इतरांनाही त्याची माहिती दिली आणि त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याचे शेळके यांनी सांगितले. माझ्या मुलाबाबत हा निर्णय मी अगदी खंबीर मनाने घेतला आणि यापुढे अवयवदान चळवळीत जागृती करण्यासाठी मी काम करणार आहे, अशी इच्छा शेळके यांनी व्यक्त केली.

आजपर्यंत नोकरीनिमित्त मुलांना मला वेळ देता आला नव्हता. परंतु, या लॉकडाऊनमध्ये मुलांशी संवाद साधण्याचा, त्यांच्याबरोबर राहण्यासाठी खूप वेळ मिळाला. या काळात मी आणि मुलगा अगदी मित्रांप्रमाणे रहात होतो. त्यामुळे त्याच्याबरोबर मला खूप वेळ राहता आले. इथुन पुढे मी अवयवदान चळवळीसाठी काम करणार आहे.
-अजय शेळके, क्षितीजचे वडील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT