दीपेश सुराणा :
पिंपरी : वर्षाला एक लाखापेक्षा कमी अर्थात प्रतिमहिना 8 हजार रुपये इतके उत्पन्न असणार्या नागरिकांचे केशरी रेशनकार्ड केवळ शोभेसाठी उरले आहे. इतके कमी उत्पन्न असणार्या शहरातील सुमारे 2 लाखांवर कुटुंबीयांना रेशन धान्याचा कणही मिळत नसल्याने त्यांना वाढत्या महागाईत झळ सोसावी लागत आहे.
केवळ कोरोनाकाळात मिळाले धान्य
प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी कार्डधारकांना (एनपीएच) 2012-13 पर्यंत शिधापत्रिकेवर धान्य मिळत होते. त्या वेळी त्यांना 7.20 रुपये किलो दराने गहू आणि 9.80 रुपये किलो दराने तांदूळ दिला जात होता. शासनाने ठरविलेल्या दरानुसार शिधापत्रिकाधारक धान्य घेत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हे धान्य देणे थांबविण्यात आले. त्यानंतर 2020 मध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीसाठी केशरी कार्डधारकांना (एनपीएच) 8 रुपये किलोने गहू तर, 12 रुपये किलोने तांदूळ देण्यात आला.
एएवाय, पीएचएच कार्डधारकांना मिळते धान्य
अंत्योदय अन्न योजनेत (एएवाय) समाविष्ट असलेल्या कार्डधारकांना 21 हजार रुपये इतक्या वार्षिक उत्पन्नाची अट आहे. त्यांना पिवळे रेशनकार्ड मिळते. प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांसाठी वार्षिक 59 हजार रुपयांच्या उत्पन्नाची अट आहे. त्यांना केशरी कार्ड मिळते. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचा लाभ मिळतो. त्यांना सध्या केंद्र सरकारमार्फत मोफत 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू देण्यात येत आहे. त्याशिवाय एएवाय योजनेतील कार्डधारकांना 1 किलो साखरही दिली जात आहे. 59 हजारांपेक्षा अधिक आणि 1 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणार्या कार्डधारकांनाही केशरी कार्डच मिळते. मात्र, त्यांना धान्य मिळत नाही. त्याचप्रमाणे, वार्षिक एक लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणार्या कार्डधारकांना पांढरे कार्ड देण्यात येते. त्यांनाही धान्य मिळत नाही.
शहरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानामध्ये धान्य दिले जाते. एनपीएचमधील लाभार्थ्यांना धान्य दिले जात नाही. वार्षिक 59 हजारांपेक्षा अधिक आणि 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कार्डधारकांचा त्यामध्ये समावेश आहे. त्याशिवाय, 1 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कार्डधारकांनादेखील धान्य दिले जात नाही.
– सचिन काळे, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, निगडीवार्षिक 59 हजारांपेक्षा अधिक आणि 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानामध्ये धान्य मिळायला हवे. वाढती महागाई लक्षात घेता राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. त्याचप्रमाणे, सध्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये गहू, तांदूळ आणि साखरच दिले जात आहे. रॉकेल, पामतेल देण्याचीदेखील सोय व्हायला हवी.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशन
शहरामध्ये 2 लाख 15 हजार 743 केशरी कार्डधारक
शहरामध्ये 2 लाख 15 हजार 743 इतके केशरी कार्डधारक (एनपीएच) आहेत. वार्षिक 59 हजारांपेक्षा अधिक आणि 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न गटातील कार्डधारकांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांना कोरोना काळामध्ये दोन महिन्यांचा कालावधी वगळता जवळपास दहा वर्षांपासून धान्यच मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचे रेशनकार्ड हे केवळ नावालाच उरले आहे. वाढती महागाई लक्षात घेता अल्प उत्पन्न गटातील या लाभार्थ्यांना धान्य मिळणे गरजेचे आहे.