नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग विरोधी पक्षांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काढू नये. नकारात्मकता बाजूला सारून सकारात्मक भुमिकेने पुढे जावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. विरोधी पक्षांनी विरोधासाठी विरोध करणे सोडल्यास आणि देशहिताच्या सकारात्मक गोष्टींना पाठिंबा दिला तर देशामध्ये त्यांच्याबद्दलचा असलेला राग कमी होईल असा उपरोधिक सल्लाही पंतप्रधानांनी दिला.
संसद अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी, प्रथेप्रमाणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सहकार्याचे आवाहन केले. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल उत्साहवर्धक असल्याचे सांगताना देशाने नकारात्मकता नाकारली असे मोदी म्हणाले. संसद अधिवेशनात सहकार्य मिळावे यासाठी विरोधी पक्षांसमवेत बातचित करण्यात आली असल्याचे सांगताना मोदी म्हणाले, की लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्तीसाठी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी लोकशाहीचे हे मंदिर सर्वोत्तम व्यासपिठ आहे. त्यामुळे सर्व खासदारांनी तयारीने यावे आणि सभागृहात सादर होणाऱ्या विधेयकांवर साधकबाधक चर्चा करावी. सभागृहात खासदारांकडून येणाऱ्या सूचनांमध्ये त्यांच्या अनुभवाचा समावेश असतो.
त्यामुळे चर्चा झाली नाही तर त्यातून देशाचे नुकसान होते. सभागृहातील चर्चा ही विरोधी पक्षात बसलेल्या मित्रांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यांनी या अधिवेशनात पराभवाचा राग काढू नये. तर या पराभवातून धडा घ्यावा आणि मागील नऊ वर्षांपासून सुरू असलेली नकारात्मकता सोडून सकारात्मक व्हावे. त्यातूनच काहीतरी मार्ग निघेल आणि त्यांच्कडे पाहण्याचा देशाचा दृष्टीकोन बदलेल असे मोदी म्हणाले. विरोधकांनी पराभवातून निराश होण्याची गरज नाही. आपली ताकद दाखविण्यासाठी त्यांना काही तरी करावे लागेल. परंतु त्यासाठी लोकशाहीच्या मंदिराला व्यासपीठ बनवू नका. बाहेरच्या पराभवाचा राग सभागृहात काढू नका. देशाला सकारात्मकतेचा संदेश देणे त्यांच्या हिताचे आहे, असे मोदी म्हणाले.
निवडणूक निकालांवरही मोदींनी यावेळी मतप्रदर्शन केले. ते म्हणाले, की विधानसभा निवडणुकीचे निकाल लोकांच्या कल्याणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध असलेल्या लोकांना प्रोत्साहन देणारे आहेत. महिला, तरुण, शेतकरी आणि गरीब या चार 'जाती'च्या सक्षमीकरणासाठी पाठिंबा मिळाला आहे. काही जणांनी याला प्रो-इन्कम्बन्सी, गुड गव्हर्नन्स किंवा पारदर्शकता देखील म्हटले असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले.