लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे देशातले राजकीय वातावरणही तापू लागले आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्रित येण्याच्या मोहिमेस सुरुवात केली आहे. एकीच्या द़ृष्टीने खासकरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि संयुक्त जदचे नेते नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. खर्गे आणि नितीश कुमार यांनी गेल्या काही दिवसांत असंख्य विरोधी नेत्यांनी एक तर प्रत्यक्ष भेट घेतली अथवा दूरध्वनीवरून त्यांच्याशी संवाद साधला आहे.
तमाम विरोधी पक्ष एकत्र आल्याशिवाय भाजपला मात देता येणार नाही, याची या दोन नेत्यांना पुरेपूर कल्पना आहे. विरोधकांना एकत्र आणण्याच्या या मोहिमेला आगामी काळात किती रंग चढणार, हे पाहण्यासारखे राहील. लोकसभा निवडणुकीला आता सव्वा वर्षाचाच कालावधी राहिलेला आहे. दरम्यान, काळात होत असलेल्या कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपला पाणी पाजण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी पक्षाला नवसंजीवनी देतानाच विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. द्रमुकचे स्टॅलिन, संयुक्त जदचे नितीश कुमार, राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी खलबते केल्यानंतर काँग्रेसपासून चार हात लांब राहणार्या तृणमूलच्या ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्याशी संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. काँग्रेस आणि भाजपपासून समान अंतर ठेवणार्या ओडिशातील बिजू जनता दल आणि आंध्रमधील वायएसआर काँग्रेस यांच्याशीही बोलणी करण्याची इच्छा काँग्रेसने दाखविली, तर त्यात आश्चर्य वाटू नये.
विरोधी पक्षांच्या एकीच्या प्रयत्नांची गेल्या आठवड्यात भाजपच्या अनेक नेत्यांनी खिल्ली उडविली. मात्र, खर्गे यांना खरोखर विरोधी पक्षांची मोट बांधण्यात यश आले, तर भाजपच्या उरात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. तिकडे विरोधकांना एकत्र आणण्यात गुंतलेल्या नितीश कुमार यांना दणका देण्याच्या योजनेवर भाजपने काम सुरू केले आहे, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. बिहारमध्ये महाआघाडीत सामील असलेल्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे नेते जीतनराम मांझी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तर दुसरीकडे लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची घेतलेली भेट बरेच काही सांगून जाते. छोट्या-छोट्या पक्षांना एकत्र आणून नितीश कुमार यांचे आसन डळमळीत करण्याचा तर भाजपचा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा या भेटीगाठींमुळे रंगली आहे. तृणमूल आणि आम आदमी पक्षाने विरोधी आघाडीत यावे, अशी नितीश कुमार आणि शरद पवारांसारख्या नेत्यांची मनोमन इच्छा आहे. मात्र, हे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीत मनापासून सामील होणार काय, हा खरा प्रश्न आहे.
संसद अधिवेशन पार पडल्यानंतर निघालेला तिरंगा मार्च असो वा विरोधी पक्षांच्या दिल्लीत झालेल्या काही बैठका असो, तृणमूल आणि 'आप' खासदारांनी यात सहभाग घेतला असला तरी प्रत्यक्ष निवडणुकांच्या द़ृष्टीने हे पक्ष एका मंचावर येणार काय, याबद्दल साशंकता आहे. मनिष शिसोदिया, सत्येंद्र जैन हे आपचे दोन मोठे नेते सध्या तिहार तुरुंगात आहेत. तर मद्य धोरण घोटाळा प्रकरणाचा ससेमिरा खुद्द अरविंद केजरीवाल यांच्यामागे लागलेला आहे. अशावेळी केजरीवाल यांना काँग्रेसचा आधार वाटू लागला, तर त्याचे आश्चर्य वाटू नये.
भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर जोरदार प्रचार करीत आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबमधून काँग्रेसची सद्दी संपविलेली आहे. तथापि बदलत्या परिस्थितीत एकट्याने वाटचाल करणे केजरीवाल यांच्यासाठी कठीण जाणार आहे. काँग्रेस, संयुक्त जद, राजद अशा पक्षांसोबत जाण्याचा 'आप' ला फायदा होणार की तोटा, याचे आकलनही राजकीय वर्तुळात केले जाऊ लागले आहे. केजरीवाल महाआघाडीत सामील झाले, तर लोकसभा निवडणुकीत या पक्षाला चांगला फायदा होऊ शकतो. राज्यसभेत आपचे 15 खासदार आहेत, तर लोकसभेत एकही खासदार नाही. महाआघाडीत जाण्याने दिल्ली, पंजाबसह इतर काही राज्यांत लोकसभेच्या बर्याच जागा आपच्या पदरी पडू शकतात. मात्र, विधानसभा निवडणुकांत उलट स्थितीचा सामना 'आप'ला करावा लागू शकतो.
केजरीवाल यांचा पक्ष सध्या कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत गुंतलेला आहे. कर्नाटक आणि मध्य प्रदेशात भाजपचे सरकार सत्तेत आहे, तर छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. चारही ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट मुकाबला आहे. अशावेळी तिसरा पर्याय म्हणून आप जनतेकडे मत मागत आहे. मात्र, आघाडीत सामील झाल्यानंतर आप पक्ष काँग्रेसच्या बाजूने असल्याचा संदेश जाईल आणि ही स्थिती केजरीवाल यांच्यासाठी कठीण ठरेल. आप काँग्रेससोबत गेली, तर भाजपला केजरीवाल यांची कोंडी करणे अधिक सुलभ होणार आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल. असेच काहीसे चित्र तृणमूलसोबतही आहे. दशकभरापेक्षा जास्त काळ काँग्रेसपासून लांब राहिलेल्या ममता बॅनर्जी पुन्हा काँग्रेसच्या मंचावर आल्या, तर त्याच्या राजकीय लाभाबरोबर तोटेही त्यांना सहन करावे लागतील.
एक उमेदवार देण्याची नीती
भाजपला उलटे आस्मान दाखवायचे असेल, तर एका मतदारसंघात एकच उमेदवार द्यावा, अशी कल्पना नितीश कुमार यांनी मांडली आहे. अर्थात तसे झाले तर सर्वात जास्त बलिदान काँग्रेसलाच द्यावे लागणार आहे. एकच उमेदवार द्यायचा झाला, तर लोकसभेच्या सुमारे अडीचशे जागा काँग्रेसच्या वाट्याला जातील, तर तीनशेच्या आसपास जागा अन्य विरोधी पक्षांना जातील. काँग्रेसकडून अशा प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली जाण्याची शक्यता खूप कमी आहे.
अन्य कोणाकडे काही प्रस्ताव असतील, तर तेही दिले जावेत, असे आवाहन नितीश कुमार यांनी केले आहे. यावर कशा प्रकारचे प्रस्ताव येतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तृणमूल, 'आप' सोबत चर्चा करण्याची जबाबदारी नितीश यांनी स्वतःकडे ठेवली आहे, तर समाजवादी पार्टी, बीआरएस या पक्षांसोबत चर्चेची जबाबदारी राजद नेते तेजस्वी यादव यांच्याकडे देण्यात आली आहे. उर्वरित पक्षांसोबत काँग्रेस स्वतः आगामी काळात चर्चा करणार आहे. या चर्चांच्या माध्यमातून विरोधी महाआघाडीला मूर्त स्वरूप येणार काय, हे येणारा काळच सांगणार आहे.
– श्रीराम जोशी