पुढारी ऑनलाईन: विरोधी पक्षांची आज (दि.१८ जुलै) बंगळुरात दुसरी बैठक होत आहे. दरम्यान या विरोधी पक्ष आघाडीचे नाव बदलण्यात आले आहे. पूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव 'युपीए' (UPA-United Progressive Alliance) म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी असे होते, ते आता इंडिया (INDIA- Indian National Developmental Inclusive Alliance) म्हणजे भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी असे करण्यात आल्याचे बंगळूर येथील विरोधी पक्षाच्या आजच्या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भातील माहिती बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत (Opposition Meet Bangalore) दिली, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
विरोधी पक्षाची पुढची म्हणजे तिसरी बैठक ही मुंबईमध्ये होणार आहे. मात्र या बैठकीची तारीख अद्याप ठरलेली नाही. मात्र लवकरत आम्ही बैठक समन्वयकांच्या नावांवर चर्चा करू आणि मुंबई बैठकीची तारीख लवकरच जाहीर करू असेही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Opposition Meet Bangalore) यांनी देशातील विरोधी पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेच स्पष्ट केले आहे.
आमची एकजूट पाहूनच पीएम मोदी यांनी ३० पक्षांची बैठक बोलावली आहे. यापूर्वी ते त्यांच्या युतीबद्दल कधीच बोलत नव्हते. त्यांच्याकडे एका पक्षाचे अनेक तुकडे आहेत आणि आता मोदीजी ते तुकडे एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा हल्लाबोल देखील बैठकीचे अध्यक्ष खरगे यांनी पीएम मोदी (Opposition Meet Bangalore) यांच्यावर केला आहे.
भाजप विचारधारेला विराेध हेच आमचे लक्ष्य आहे. ही लढाई विरोधी पक्ष आणि भाजप यांच्यातील नाही तर तर देशातील दडपशाहीविरोधातील लढाई आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज (दि.१८) आपली भूमिका मांडली. बंगळूर येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशात आता दोन प्रमुख आघाडी एकमेकांविरोधी लढणार आहेत. सत्ताधारी पक्षाची एनडीए (NDA-National Democratic Alliance) आणि विरोधी पक्षांची इंडिया (INDIA-Indian National Developmental Inclusive Alliance) या दोन आघाड्यांध्ये येत्या काही निवडणुकीत स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तसेच लोकसभा २०२४ मध्ये देखील देशात सत्ताधारी पक्षाची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) विरूद्ध भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी(INDIA) अशी लढत होणार आहे.