बारामती, पुढारी वृत्तसेवा: मविआ सरकार करत असलेल्या कामामुळे अडीच वर्षानंतर होणाऱ्या निवडणूकीत आपले काही खरे नाही, अशी काहींची भावना झाल्यानेच साम, दाम, दंड, भेद ही निती वापर करत आमचे सरकार घालवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तसेच 11 तारखेला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मनात धाकधुक असल्यानेच मंत्रीमंडळ विस्तार लांबवला असल्याची टीका पवार यांनी केली.
बारामतीत राष्ट्रवादी भवनात आगामी नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, शिवसेनेत झालेल्या बंडाशी आमचा काहीही संबंध नाही असे म्हणणाऱ्या पक्षाच्या एका नेत्याच्याच पत्नीने पती वेशभूषा करून रात्रीचे कसे भेटत होते, याचे गुपित उघड केले. यातून त्यांचा विरोधाभास दिसून आला. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. परंतु 11 तारखेला काय घडतेय याची धाकधूक असल्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. पक्षांतर बंदी कायदा, नियम यामुळे वेगळा निकाल लागेल अशी धास्ती त्यांना असल्याचे पवार म्हणाले.
गेल्या अडीच वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात मविआ सरकार स्थापन झाले. कोरोना काळात राज्याने चांगली कामगिरी केली. देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश होता. परंतु शिवसेनेतील काही लोक बाजूला गेल्याने त्यांनी राजीनामा दिला. यानिमित्ताने संबंधितांचीही सुरत, गुवाहाटी व गोवा अशी चांगली सहल झाली. परंतु काहीही झाले तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे पवार म्हणाले.
बंडखोर आमदारांनी निधी मिळत नसल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. मागील युती सरकारमध्ये भाजपने शिवसेनेला कमी महत्त्वाची फक्त दहा मंत्रीपदे दिली. त्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही. त्यामुळे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यात झालेल्या सभेत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते, अशी आठवण पवार यांनी करून दिली. नवीन सरकारने मागील काही निर्णय थांबविण्याचे निर्णय घेतल्याच्या बातम्या आम्ही वाचतो आहोत. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेवून आलेले नाही. सत्ता येते आणि जाते. विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात कुठे अन्याय झाला तर विरोधी पक्षनेता म्हणून सक्षम भूमिका बजावली जाईल. त्याचबरोबर विरोधाला विरोध केला जाणार नसल्याचे पवार म्हणाले.
बारामतीला अधिकचा निधी नेल्याचे काहींकडून सांगितले जात आहे. पंतप्रधान वाराणसीचे प्रतिनिधित्व करतात. गेल्या आठ वर्षात त्यांनी तिकडे अनेक योजना नेल्या. मोठ्या प्रमाणावर निधी नेला. महत्त्वाच्या पदावर असताना आपल्या भागाला झुकते माप दिले जाते. त्यात चुकीचे काय असा सवाल पवार यांनी केला