वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. मात्र, त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देणे आपल्याला मान्य नाही, अशी भूमिका अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.
मराठवाडा दौर्यावर आलेल्या भुजबळ यांनी वडीगोद्री येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. 17 नोव्हेंबर रोजी अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी घोषित केले. ते म्हणाले, खरोखर निजाम काळातील कुणबी प्रमाणपत्र मिळाले असेल त्यांना आरक्षण द्या; परंतु अगोदर 5 हजार, नंतर 10 हजार, नंतर 15 हजार; मग अख्ख्या महाराष्ट्रात, म्हणजे समोरच्या दरवाजातून प्रवेश मिळत नाही, तर मागच्या दारातून येण्याचा कार्यक्रम आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, आमच्या आरक्षणात तुम्ही येऊ नका. आमच्या जवळजवळ 354 जाती असून, 54 टक्क्यांपेक्षा जास्त लोक आहेत. त्यांच्या आरक्षणावर गदा येईल, असे कोणतेही पाऊल उचलले गेले तर त्याला आम्ही जोरदार विरोध करू, असेही ते म्हणाले.