पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील एका व्यक्तीचा दुर्मिळ पॉवासन विषाणूमुळे (Powassan virus disease) मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे मृत्यू होण्याची या वर्षातील अमेरिकेतील पहिली घटना आहे. याबाबतची माहिती मेन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने दिली आहे. मृत व्यक्ती अमेरिकेली मेन राज्यातील सगाडाहॉक काउंटी (Sagadohoc County) येथील रहिवाशी आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकार्यांनी येथील लोकांना घातक विषाणूजन्य रोगाबद्दल सतर्क केले आहे. या विषाणूची लागण झाल्यानंतर विशिष्ट लस अथवा औषध उपलब्ध नाही.
पॉवासन रोग (POWV) हा एक दुर्मिळ पण गंभीर आजार आहे जो पॉवासन विषाणूमुळे होतो. जंगलातील संक्रमित डिअर टिक, ग्राउंडहॉग टिक चावल्यानंतर त्याचा प्रसार मानवांमध्ये होतो. टिक्स हे परजीवी असून ते प्राणी, पक्षी आणि कधीकधी सरपटणारे प्राणी आणि उभयचरांचे रक्त पिऊन जगतात. बहुतांश प्रकरणांमध्ये या रोगाची लागण अमेरिकेच्या ईशान्य आणि ग्रेट लेक्स प्रदेशांमध्ये वसंत ऋतुच्या उत्तरार्धात आणि शरद ऋतूच्या मध्यादरम्यान होते. पण अलीकडील काही दिवसांत अन्य भागांमध्येदेखील पॉवासनची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
अमेरिकेत दरवर्षी २५ लोक या रोगाने संक्रमित होतात. आता मेन राज्यात यामुळे एका मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेत २०१५ पासून आतापर्यंत या रोगामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे, असे वृत्त फॉक्स न्यूजने दिले आहे.
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेशनच्या माहितीनुसार, ज्यांना या विषाणूची लागण होते त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पण टिक चावल्यानंतर एक आठवड्यापासून एक महिन्यापर्यंत ताप, डोकेदुखी, उलट्या आणि अशक्तपणा येऊ शकतो.
काही प्रकरणांमध्ये बोलण्यात अडचण येऊ शकते. आजार गंभीर असताना दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
पॉवासन विषाणू रोगावर कोणतीही विशिष्ट लस किंवा औषध उपलब्ध नाही. याची लागण होऊ नये म्हणून लोकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येतो. अशा प्रकरणात विश्रांती घेणे, द्रव पदार्थांचे भरपूर सेवन करणे आवश्यक आहे आणि गंभीर आजारी झाल्यास रुग्णालयात दाखल व्हावे लागते.
हे ही वाचा :