मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी विविध तुरुंगातून ५० टक्क्यांहून अधिक शिक्षा भोगलेल्या तब्बल १५० कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. त्यामुळे किरकोळ गुन्ह्यांखाली राज्यातील विविध तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
देशाच्या स्वातत्र्यांला ७५ वर्षे यंदा पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ५० टक्क्यांहून अधिक शिक्षा भोगलेल्या, चांगली वर्तणूक, आणि इतर निकषांनुसार पात्र कैद्यांना केंद्रिय गृहमंत्रालयाद्वारे विशेष माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अमृतमहोत्सवी वर्षात आतापर्यत महाराष्ट्रातून गेल्यावर्षी १५ ऑगस्ट, २०२२ रोजी २०६, यावर्षी २६ जानेवारी रोजी १८९ तर आता १५ ऑगस्ट २०२३ रोजी १५० कैद्यांना सोडण्यात येणार आहे. कैद्यांना सोडण्याबाबत गृह विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. कारागृहातील शिस्त आणि चांगली वर्तणूक ठेवणाऱ्या कैद्यांची सुटका करून त्यांनी देशाचे जबाबदार नागरिक व्हावे, यासाठी ही संधी दिली जाते. दरम्यान, मृत्यूदंडाची सुनावलेली शिक्षा, खून, बलात्कार, दहशतवादी, भ्रष्टाचार, मोक्का आदी गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेले तसेच जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना मात्र माफी दिली जात नाही.