Latest

ओमायक्रॉन बाधित केवळ ‘पॅरासिटेमॉल’ने बरे

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पीटीआय : दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या ओमायक्रॉनबाधितांना पॅरासिटेमॉल आणि प्रथिनांचे प्रमाण वाढवणार्‍या गोळ्या दिल्या जात आहेत आणि केवळ एवढ्या उपचाराने हे रुग्ण बरेही होत आहेत, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी शुक्रवारी दिली. दिल्लीतील या सर्वात मोठ्या रुग्णालयात आतापर्यंत दाखल 40 ओमायक्रॉनबाधितांपैकी 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

ओमायक्रॉनबाधित रुग्णांपैकी 90 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत. दहा टक्के रुग्णांना घशात खवखव, ताप आणि अंगदुखीचा त्रास यासारखी सौम्य लक्षणे होती. उपचारादरम्यान मल्टी व्हिटॅमिन आणि पॅरासिटेमॉलच्या गोळ्या त्यांना देण्यात आल्या. अन्य कोणत्याही गोळ्या देण्याची गरज जाणवली नाही, असेही या डॉक्टरांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे एकूण 67 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 23 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

दाखल रुग्णांची वैशिष्ट्ये

  • जवळजवळ सर्वच रुग्ण परदेशातून आलेले आहेत.
  • सर्वच रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेऊन झालेले आहेत.
  • तीन चतुर्थांश जणांनी लसीचा बूस्टर डोसही घेतला आहे.

कोरोना बूस्टर डोसचा निर्णय वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे

नवी दिल्ली ः जगभरात कोरोना महारोगराईची चौथी लाट आली आहे. संसर्ग दर 6.1 टक्के नोंदवण्यात आल्याने सतर्क राहण्याची आवश्यकता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली. बूस्टर डोसची आवश्यकता तसेच कालावधीशिवाय बालकांच्या लसीकरणासंंबंधीचे निर्णय वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे घेतले जातील, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले. देशात अद्यापही कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव अधिक असल्याची माहिती 'आयसीएमआर'चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली.

'बूस्टर'ची प्रक्रिया सुरू; 3 हजार जणांवर चाचणी

नवी दिल्ली : संपूर्ण लसीकरण झालेल्या जवळपास 3 हजार नागरिकांवर कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोसची चाचणी घेण्यात येणार आहे. 'ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (टीएचएसटीआय) अंतर्गत 'डिपार्टमेंट ऑफ बायोटेक'मार्फत बूस्टर डोसच्या उपयुक्ततेवर अध्ययन केले जाईल. ओमायक्रॉनमुळे तिसर्‍या लाटेची भीती वर्तविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर बूस्टर डोसचे महत्त्व अनेकांकडून विशद करण्यात आले. परंतु, अद्याप बूस्टर डोससंबंधी केंद्र सरकारचे धोरण स्पष्ट नाही. या चाचणीअंती मात्र सरकारचे धोरण ठरणार आहे. 'कोव्हिशिल्ड' लसीचा प्रभाव दोन्ही डोस घेतल्याच्या तीन महिन्यांनंतर कमी होतो, असा दावा 'लान्सेट जर्नल'मध्ये प्रकाशित एका अहवालातून करण्यात आला आहे.

सध्याची उपचार पद्धती पुरेशी : भूषण

कोरोनाची पहिली लाट आणि डेल्टा व्हेरियंट संसर्गावेळी वापरलेली उपचार पद्धती प्रभावी असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केले. जगभरातील 108 देशांमध्ये 1,51,000 हून जास्त ओमायक्रॉन केसीस नोंद झाल्या आहेत. भारतात शुक्रवारी सकाळपर्यंत ओमायक्रॉनचे 358 बाधित आढळले असले, तरी त्यातील 114 जण बरे झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT