पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्स यांच्यातील मैत्रीचे अनेक किस्से आहेत. दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात आणि त्यांच्या मैत्रीबद्दल मोकळेपणाने बोलतात. एबीडी आणि विराट आयपीएल (IPL)मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघासाठी एकत्र खेळले आहेत.
आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाच्या शेवटच्या सामन्यात विराटने शतक झळकावले आणि यासोबतच त्याच्या 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाची अडीच वर्षांची प्रतीक्षाही संपुष्टात आली. आपल्या जिगरी दोस्ताच्या शतकामुळे एबीडीचा आनंद गगनात मावेना. तो खूप खूश झाला. एबीडीने आधी ट्विटरवर, नंतर इन्स्टाग्रामवरून विराटचे अभिनंदन केले. एबीडीने विराटसोबतचा एक जुना फोटो शेअर केला, जो पाहून विराटची पत्नी अनुष्का शर्माही हैराण झाली.
फोटो शेअर करताना एबीडीने लिहिले की, 'विराटच्या शतकामुळे मला वाटले की हा जुना फोटो शेअर करावा. तू आज चांगली फलंदाजी केलीस, असे आणखी अनेक डाव येतील. तुझी फलंदाजी अशीच बहरत राहो ही सदिच्छा'. एबीडीने शेअर केलेल्या फोटोमध्ये विराट आणि तो स्कूटरवर बसले आहेत. हा फोटो पाहून चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनुष्कालाही मोह आवरला नाही आणि तिने कमेंट करत म्हटले की, 'ओह माय गॉड'. तिची ही कमेंट खूप व्हायरल होत आहे. गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सुपर 4 फेरीतील सामन्यात विराटने नाबाद 122 धावांची वादळी खेळी केली करून तब्बल 1020 दिवसांनी शतकांचा दुष्काळ संपवला. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे पहिले शतक ठरले.
विराट कोहलीला फॉर्म गवसल्याने आणि त्याचे 71 वे शतक पूर्ण झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. याच प्रमाणे बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिचा पती क्रिकेटर विराटचे हे यश सोशल मीडियावर एका प्रेमळ पोस्टद्वारे साजरे केले आहे.
अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर विराट कोहलीचे काही फोटो शेअर केले आहेत आणि त्यासोबत तिने एक हृदयस्पर्शी नोटही शेअर केली आहे. अनुष्का शर्माने लिहिलंय की, 'नेहमी तुझ्यासोबत, कोणत्याही आणि प्रत्येक माध्यमातून'! यासोबतच विराट कोहलीनेही हार्टची इमोजी पोस्ट करून अनुष्काच्या पोस्टला प्रतिसाद दिला आहे.
विराटने आपले 71 वे शतक पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका हिला समर्पित केले आहे. सामन्यानंतर कोहली म्हणाला की, 'मी धन्य आणि कृतज्ञ आहे. गेली अडीच वर्षे मला खूप काही शिकवून गेली. मी लवकरच 34 वर्षांचा होत आहे. संतप्त उत्सव ही भूतकाळातील गोष्ट आहे. एका व्यक्तीने माझ्या दृष्टीकोनातून गोष्टी मांडल्या आहेत म्हणून तुम्ही मला इथे उभे असलेले पाहता. ती अनुष्का आहे, हे शतक तिला आणि आमची लहान मुलगी वामिकाला समर्पित करतो', अशी भावना त्याने व्यक्त केली.