Latest

ओडिशा अपघात प्रकरण : सीबीआय लवकरच सुरू करणार तपास

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने सरकारने सीबीआयला पत्र लिहिले असून लवकरच सीबीआय चौकशीला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान दुर्घटना स्थळावरुन परतलेल्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी यांनी पंतप्रधान कार्यालयात जाऊन अपघाताबाबतची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. लाहोटी हे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे समजते.

2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात 275 लोकांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो लोक जखमी झाले होते. सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले होते. त्यानुसार चौकशीबाबत विचारणा करणारे पत्र सीबीआयला पाठवण्यात आले आहे. तिकडे ओडिशा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली आहे.

दुर्घटनेसाठी रेल्वेचे कर्मचारी जबाबदार होते? की रेल्वेच्या सिग्नल व इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीत बिघाड करून घातपात घडवून आला, याचा सर्वप्रथम शोध घेतला जाणार आहे. अपघातात रेल्वेच्या चालकांची चूक नसल्याचे तसेच गाड्यांचा वेग मर्यादेबाहेर नसल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले होते. दरम्यान रेल्वेचे काही वरिष्ठ अधिकारी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय खाजगीत व्यक्त करीत आहेत. बोर्डचे अध्यक्ष लाहोटी यांनी अपघाताबाबतची सविस्तर माहिती पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांसोबतच या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पंतप्रधान मोदी यांना मंगळवारी भेटून त्यांनाही अहवाल सादर करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT