पुढारी ऑनलाईन डेस्क : World Cup Team India : वनडे विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या निवड समितीने मंगळवारी (5 सप्टेंबर) या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. 15 सदस्यीय संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली असून हार्दिक पंड्याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताने आतापर्यंत दोनवेळा विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. 1983 आणि 2011 टीम इंडियाच्या खेळाडूंनी ही चमकदार कामगिरी नोंदवली आहे. आता 2023 ची विश्वचषक स्पर्धा भारतात होत असून घरच्या मैदानावर पुन्हा एकदा विश्वचषक उंचावण्याची संधी भारतीय संघाकडे असून त्या दृष्टीने संघात 15 खेळाडूंची निवड झाल्याचे निवड समितीचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी सांगितले आहे. (World Cup Team India)
2023 च्या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील कोहली हा एकमेव खेळाडू आहे जो 2011 च्या विश्वचषकाचा भाग होता. कोहलीने त्या स्पर्धेत 282 धावा केल्या होत्या. रोहित शर्माची 2011 च्या वर्ल्ड कपसाठी निवड झाली नव्हती. कोहली व्यतिरिक्त, 2011 च्या संघातील फक्त रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. पियुष चावला आणि धोनी आयपीएलमध्ये खेळताना दिसतात, बाकी सर्व खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील रोहित सर्वात वयस्कर आणि शुभमन गिल हा सर्वात तरुण खेळाडू आहे. संघातील 7 खेळाडूंचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त आहे. यापैकी रोहितचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त आहे. याशिवाय असे 7 खेळाडू आहेत ज्यांचे वय 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान आहे. भारतीय संघातील एकच खेळाडू 25 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे.
रोहित शर्मा (36 वर्षे), विराट कोहली (34 वर्षे), रवींद्र जडेजा (34 वर्षे), मोहम्मद शमी (33 वर्षे), सूर्यकुमार यादव (32 वर्षे), शार्दुल ठाकूर (31 वर्षे), केएल राहुल (31 वर्षे), हार्दिक पंड्या (29 वर्षे), जसप्रीत बुमराह (29 वर्षे), अक्षर पटेल (29 वर्षे), मोहम्मद सिराज (29 वर्षे), श्रेयस अय्यर (28 वर्षे), कुलदीप यादव (28 वर्षे), इशान किशन (25 वर्षे), शुभमन गिल. (23 वर्षे)